नांदेड जिल्ह्यात काही पोलीस निरिक्षकांनी आपल्या नातलगांनाच वसुलीसाठी नेमले ; राज्यभर अंमलात यावा असा उपक्रम

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या काही पोलीस निरिक्षकांनी आपल्या नातलगांना वसुलीसाठी लावून एका अर्थी पोलीस अंमलदारांवर अन्याय केला आहे. नातलगांमुळे कोणाला हिस्सा देण्याची गरज शिल्लक राहिली नाही आणि हे सर्व नातलग पुन्हा अवैध धंदे करून लवकर श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहेत. यात काही जणांची नावे प्रभु श्री रामाची आहेत.
पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत झाल्यानंतर सर्वात मोठा उद्देश असतो आपल्याला वजनदार ठाणे मिळावे. वजनदार या शब्दामध्ये भरपूर काही वजन आहे. कोणते वजन काय काम करते याची एक मोठी संकल्पना तयार केली जाते. त्या वजनाचा वापर कधी आणि कसा करायचा याची एक भुमिका तयार होते आणि या भुमिकेच्या आधारावर हे वजनदार ठाणे चालवले जाते. पोलीस दृष्टीकोणातून वजनदार ठाण्याचा अर्थ ज्या ठिकाणी गुन्हे नोंदणीची प्रक्रिया मोठ्या स्वरुपात आहे आणि त्या गुन्हेगारांना आपल्या जरबेद ठेवण्याची जबाबदारी मोठ्या मेहनतीने पार पाडावी लागते त्यालाच वजनदार ठाणे म्हणतात. इतर वजनांचा वेगवेगळा अर्थ आहे आणि जो वास्तव न्युज वाचेल त्याला त्या वजनांचे अर्थ आपल्या परीने घेण्याचा अधिकार आहे. असो पण एक बाब जनतेसमोर आणि वास्तव न्युज लाईव्हच्या वाचकांसमोर मांडायची आहे की, आता पोलीस निरिक्षकांसाठी गुपचूपची कामे करायला त्यांनी नवीन पर्याय शोधला आहे. हा पर्याय आहे त्यांचे नातलग. या नातलगांमध्ये कोणते नातलग ऐकतील, कोणते बेईमान होती, कोणत्या नातलगांकडून धोका होईल याची चाचपणी करण्यात तर पोलीस निरिक्षक तर तरबेज असतातच आणि आपल्या तरबेजपणाचा उपयोग करून ही नवीन पध्दत आणली गेली आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात सुध्दा सर्वत्र वसुलीसाठी वाळू हा विषय मोठा आहे. यामध्ये काम करत असतांना आपल्याच नातलगांना वाळूचा धंदा पण करायला लावायचा आणि त्यांच्यावतीनेच आपली वसुलीपण करून घ्यायची यामुळे कोणी बोट करणार नाही, कोण्या पोलीस अंमलदारावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कार्यवाही केली तरी नियंत्रण कक्षाची जबाबदारी मिळणार नाही. प्रश्न त्या पोलीस अंमलदारांचा आहे ज्यांचा हा हक्क इतर नातलगांना मिळाला. अनेक पोलीस निरिक्षकांसाठी अनेक पोलीस अंमलदार पकडले गेले, पोलीस कोठडीत राहिले, न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरुंगात राहिले आणि नंतर जामीन मिळाला असेही प्रकार घडतात. मग त्या पोलीस अंमलदारांना काय प्राप्त झाले ज्याच्यासाठी त्यांनी एवढी मोठी रिस्क घेतली. आजपर्यंतच्या ईतिहासात भ्रष्टाचाराने, वाईटमार्गाने पैसे कमावणाऱ्यांची अवस्था काही छान राहिलेली नाही. जीवनाच्या कोणत्या तरी वळणावर त्यांना या वाईट कामातून मिळवलेल्या पैशांचे उत्तर द्यावे लागलेले आहे. पण नांदेडच्या काही पोलीस निरिक्षकांनी आपल्यासोबत या वाईटवृत्तीमध्ये आपल्याच नातलगांना सामील करून घेतल्यामुळे एक नवीन पध्दत तयार झाली आहे. ती उत्कृष्ट पध्दत राज्यभर अंमलात आणली तर बऱ्याचश्या समस्या आपोआप कमी होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *