
नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणूक 2022 मध्ये नोंदणीकृत पदवीधर गटातील निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या, गैरव्यवहार करून नियमबाह्य प्रक्रिया राबविल्याची चौकशी करावी असा अर्ज विद्यापीठाच्या कुलगुरूंना खुल्या प्रवर्गातील उमेदवार प्रा.राजू सोनसळे यांनी दिला आहे.
नांदेडच्या स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाची सिनेट निवडणूक 13 नोव्हेंबर रोजी पार पडली. त्या निवडणुकीत नोंदणीकृत पदवीधरांच्या खुल्या प्रवर्गातील गटातून प्रा.राजू मधुकरराव सोनसळे यांनी निवडणूक लढवली. आज दि.18 नोव्हेंबर रोजी त्यांनी कुलगुरूंना दिलेल्या अर्जानुसार या निवडणूकीत बेकायदेशीररित्या आणि नियमबाह्य प्रक्रिया फक्त काही ठरावीक समाजाला फायदा होण्यासाठी आणि माझ्यासारख्या मागासवर्गातील लोकांवर अन्याय करण्यासाठी मुद्दाम राबवल्या आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गातून निवडणुक लढविणाऱ्या मागास समाजातील प्रतिनिधींचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. निवडणुक निर्णय अधिकाऱ्याने निवडणूक प्रक्रिया राबवतांना अनेक अनाागोंदी केल्या. त्याचे उदाहरणे प्रा.राजू सोनसळेंनी आपल्या अर्जात लिहिली आहेत. सिनेट निवडणुक 2022 मध्ये पदवीधर लोकांची मतदार नोंदणी पुर्ण झाल्यानंतर पाच महिने जाणिवपुर्वक मतदान प्रक्रिया लांबवली. मतपत्रिकेवर अनुक्रमांक नव्हता. मतपत्रिका बदलण्याचे षडयंत्र निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे. मत पत्रिकेत उमेदवाराच्या नावासमोर अनुक्रमांक न टाकल्याने मोठा गैर व्यवहार झाल्याचे दिसते.
सिनेट पदवीधर गटाचा निकाल जाहीर करतांना बुथनिहाय मतदान जाहीर झाले. परंतु बुथनिहाय उमेदवारांची मते जाहीर झाली नाहीत. निवडणूक प्रक्रियेत खुल्या गटाची मतदार संख्या 10 हजार 944 होती. त्यामुळे मतदान पत्रिका सुध्दा 10 हजार 944 छापल्या गेल्या. या गटात 5 हजार 784 मतदारांनी मतदान केले. पण उर्वरित कोऱ्या मतपत्रिका मतमोजणीच्या वेळेत उमेदवारांना दाखवल्या नाहीत. सिनेट निवडणुकीतील मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी यामध्ये तीन दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे या तीन दिवसातील मतमोजणी कक्षातील मतपत्रिका ठेवलेल्या कक्षाचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे अशी मागणी केली आहे.