2 लाख 10 हजार रुपये चोरले होते ; 1 लाख 40 हजार जप्त, एक दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर येथे आपल्या मावशीच्या घरी चोरी करणाऱ्या पुत्राला स्थानिक गुन्हा शाखेने पकडून चोरी केलेल्या रक्कमेतील 1 लाख 40 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.त्याने आणि त्याच्या मित्राने मिळून हा चोरीचा कारभार केला होता. देगलूर न्यायालयाने या चोरट्याला पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.14 नोव्हेंबर रोजी देगलूर शहरातील देशपांडे गल्ली राहणाऱ्या माधव विश्र्वनाथ गादगे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी झाली. तपासणी केली असता घरातील 2 लाख 10 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. चोरट्यांच्या दुर्देवाने पोलीसांनी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरातील एक माधव गादगे यांच्या साडूचाच मुलगा होता. या घटनेबद्दल स्थानिक गुन्हा शाखेने आपल्या कसबांना वापरून रामेश्र्वर उर्फ रामा किशोर कुंभार (21) रा. पिंपळगाव (गाडे) ता.परळी जि.बीड यास पकडले. त्याच्याकडून चोरीच्या 2 लाख 10 हजारांपैकी 1 लाख 40 हजार रुपये रोख रक्कम आणि 9 हजार रुपयांचा एक मोबाईल असा एकूण 1 लाख 49 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही चोरीची घटना त्याने आपला मित्र यशवंत बालाजी मिरजगावे रा.लातूर याच्यासोबत मिळून केली होती.
देगलूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक 512/2022 दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत मोरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. आज श्रीकांत मोरे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी रामेश्र्वर कुंभारला देगलूर न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी रामेश्र्वर कुंभारला पकडण्याची कार्यवाही करणारे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संजय केंद्रे, गुंडेराव कर्ले, संजय जिंकलवाड, विठ्ठल शेळके, गजानन बयनवाड, शंकर केंद्रे, दिपक ओढणे, राजू सीटीकर यांचे कौतुक केले आहे.
देगलूरमध्ये मावशीच्या घरी चोरी करणारा नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडला