नांदेड(प्रतिनिधी)-सप्टेंबर 2022 मध्ये खंडणीचा गुन्हा करून फरार असलेल्या पवन जगदीश बोरा (शर्मा)ला वजिराबाद पोलीसांनी कोम्बींग ऑपरेशन दरम्यान अटक केली आहे.
दि.12 सप्टेंबर 2022 रोजी ओमप्रकाश गोपीलाल तापडीया यांनी दिलेल्या तक्ररीनुसार पवन जगदीश बोराने वेगवेगळ्या कारणांनी त्यांचे दुकान वापरले त्यात काही पैशांची देवाण-घेवाण झाली होती आणि पुढे तो दुकानाचा करार समाप्त झाला. त्यानंतर पवन जगदीश बोराने आपल्या मामासह मिळून ओमप्रकाश तापडीया यांना विविध प्रकारे त्रास देणे सुरू केले. या त्रासाच्या परिणामात ओमप्रकाश तापडीया यांनी पवन जगदीश बोराला 50 हजार रुपये खंडणी पण दिली आणि उर्वरीत 50 हजारांची खंडणी मागणी करत आहे असा त्या तक्रारीचा आशय आहे. या तक्ररीवरुन वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 386, 34 नुसान गुन्हा क्रमांक 327/2022 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे यांच्याकडे होता.
या प्रकरणी पवन जगदीश बोराच्या मामाला तेंव्हाच अटक झाली होती. पुढे न्यायालयीन प्रक्रियेने त्याला जामीन मिळाला होता. पवन बोरा मात्र फरार झाला. वजिराबाद पोलीस त्याचा शोध घेत होते पण काही तासांपुर्वी राबवलेल्या कोम्बींग ऑपरेशन मोहिमेत वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने पवन बोराला ताब्यात घेतले. आज सायंकाळी त्याला कायदेशीररित्या गुन्हा क्रमांक 327/2022 मध्ये अटक करण्यात आली आहे. सध्या पवन जगदीश बोरा (शर्मा) चे वास्तव्य वजिराबाद पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे. उद्या याप्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होईल.
या गुन्हा क्रमांक 327/2022 मध्ये अटकपुर्व जामीन मिळावा म्हणून पवन बोराने अटक पुर्व जामीन अर्ज क्रमांक 892/2022 दि.20 सप्टेंबर 2022 रोजी दाखल केला होता. न्यायालयाच्या ई कोर्टस् या ऍपवर याची माहिती घेतली असता या प्रकरणाची पुढील सुनावणी तारीख 24 नोव्हेंबर 2022 अशी आहे. आजपर्यंत या प्रकरणात कोणताही आदेश झालेला नाही.
पवन जगदीश बोरा(शर्मा) पुन्हा एकदा वजिराबाद पोलीस ठाण्याच्या कोठडीत