नांदेड(प्रतिनिधी)-वलिमा कार्यक्रमात डी.जे.वर नाचण्याच्या कारणावरुन एका युवकाचा खून झालेल्या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली बिरहारी-जगताप यांनी पाच मारेकऱ्यांना चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
कर्मविरनगर नांदेड येथे 21 नोव्हेंबर रोजी शेख नदीम याच्या लग्नानिमित्त वलीमा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात 9 वाजता डी.जे.बंद करण्यात आला. डी.जे.बंद का केला आम्हाला अजून नाचायचे आहे या कारणावरुन सोहेल खान नमीद खान(29) रा.सखोजीनगर, शेख अमेर उर्फ आम्मु शेख पाशा (23) रा.गोवर्धनघाट, मोहम्मद जाकेर मोहम्मद ताहेर (23) रा.फारुखनगर, महम्मद आसीफ महम्मद युनूस (24) आणि सय्यद सादेक सय्यद माजीद (22) दोघे रा.हमीदीया कॉलनी या पाच जणांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून नवरदेव असलेल्या शेख नदीमचा भाऊ शेख मोईन शेख एकबाल (22) याला धार-धार शस्त्रांनी मारहाण करून त्याचा खून केला. या मारहाणीत काही जणांना नवरदेवाच्या कुटूंबातील लोकांनी सुध्दा मारहाण केली. त्या संदर्भाचा वेगळा गुन्हा दाखल झाला.मयत शेख मोईन शेख एकबाल या संदर्भाने गुन्हा क्रमांक 399 दाखल झाला. या प्रकरणाचे तपासीक अंमलदार पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते यांनी अनेक पोलीस अंमलदारांसह पकडलेल्या पाच जणांना न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड.उमाकांत वाडीकर आणि पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यंानी जोरदारपणे युक्तीवाद मांडून अटकेत असलेल्या पाच मारेकऱ्यांना पोलीस कोठडीत देण्याची विनंती केली. न्यायाधीश सोनाली बिरहारी यांनी या प्रकरणी पाच जणांना चार दिवस अर्थात 28 नोव्हेंबर 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
या प्रकरणात खून करणाऱ्या गटावर जिवघेणा हल्ला केल्याप्रकरणी शेख एकबाल , शेख मोईस, शेख रऊफ आणि शेख मुन्ना हे चार जण पोलीस कोठडीत आहेत.
कर्मविरनगरातील डी.जे.वरून झालेले खून प्रकरण ; पाच मारेकऱ्यांना चार दिवस पोलीस कोठडी