नांदेड(प्रतिनिधी)-भ्रष्टाचाराबाबत हजारों वर्षांपासून जनजागृती होत आली आहे. परंतू भ्रष्टाचार थांबत नाही. अगोदर असे म्हटले जायचे की, आपल्या पापाची फळे देवाच्या घरी मिळतात. परंतू देवाने त्यात बदल केलेला आहे आणि इथे केलेल्या पापांची फळे येथेच पुर्ण करावी लागतात. असाच एक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पाठविलेल्या प्रेसनोटवरून समोर आला. 66 वर्ष असलेले आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतून उपकार्यकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले सुदाम राके आणि त्यांच्या 60वर्षीय पत्नी शांता राके यांच्याविरुध्द ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत 55.94 टक्के अपसंपदा जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या दोघांना अटक मात्र झालेली नाही.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पाठविलेल्या प्रेसनोटनुसार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमधून सेवानिवृत्त झालेले सुदाम पुरभाजी राके (66) रा.जेतवननगर नांदेड यांच्याविरुध्द एका अर्जाची उघड चौकशी झाली. ही चौकशी दि.9 मे 1998 ते 31 जुलै 2014 या कालावधीच्या त्यांच्या उत्पन्नावर आधारीत होती. या चौकशीमध्ये सुदाम पुरभाजी राके यांनी आपल्या ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत 55.94 टक्के अपसंपदा जमवलेली होती. त्या अपसंपदेची एकूण किंमत 53 लाख 96 हजार 429 रुपये आहे.
या उत्पन्नाला लपविण्यासाठी त्यांच्या पत्नी शांता सुदाम राके यांनी सुध्दा मदत केलेली आहे. याबाबत 16 वर्षाच्या तपासणीमध्ये अपसंपदा म्हणून समोर आलेल्या 53 लाख 96 हजार 429 रुपयांसाठी चौकशी अधिकारी पोलीस निरिक्षक शेषराव नितनवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सुदाम पुरभाजी राके आणि त्यांच्या पत्नी शांता सुदाम राके यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 425/2022 भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 13(1)(ई)सह 13(2) कलमे जोडण्यात आली आहेत. तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 109 सुध्दा जोडण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरिक्षक स्वप्नाली धुतराज यांच्याकडे देण्यात आला आहे.
ही उघड कार्यवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधिक्षक धर्मसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक शेषराव नितनवरे आणि पोलीस अंमलदार हनमंत बोरकर यांनी पार पाडली.
ही प्रेसनोट प्रसिध्दीसाठी देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यकाळामध्ये भ्रष्टाचार करून अपसंपदा जमवलेला असेल, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करत असेल. तसेच लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवरील व्हिडीओ, ऑडीओ क्लिप उपलब्ध असल्यास जनतेने ही माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर तक्रार करावी, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या मोबाईल ऍपवर तक्रार करावी, फेसबुक पेजवर तक्रार करावी, यासाठी टोल फ्री क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02462-253512 आणि पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 यावर सुध्दा भ्रष्टाचार आणि अपसंपदेची तक्रार करता येईल.
वीज वितरण कंपनीच्या सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता आणि त्यांच्या पत्नीने जमवली 53 लाख 96 हजार 429 रुपयांची अपसंपदा; गुन्हा दाखल