पत्रकार मुन्तजीब यांचा विशेष सन्मान
नांदेड(प्रतिनिधी)-आधुनिक काळात पत्रकारितेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. बिघडलेल्या समाजव्यवस्थेला पत्रकारांनी आस्था दाखविण्याची भूमिका पार पाडली पाहिजे. पत्रकार हा समाजातील महत्त्वाचा घटक असून सकारात्मक समाज निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री डी.पी.सावंत यांनी केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा उर्दूभाषा विभाग, इकरा मॅग्झिनच्या वतीने उर्दू पत्रकारितेच्या द्विशतकपूर्ती निर्मित उर्दूघर येथे उर्दू पत्रकारिता, दिशा व प्रगती या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य एम.ए.माजिद हे होते तर व्यासपीठावर आ.मोहनअण्णा हंबर्डे, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, प्रेस मीडिया हैदराबादचे अध्यक्ष शौकत अली नजफ, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर मसूद खान, शमीम अब्दुल्ला, अब्दुल गफार, उर्दू घरचे व्यवस्थापक डॉ.सुजा कामिल, मायनारिटी मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष अल्ताफ सामी यांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मुन्तजीब यांच्या २५ वर्षाच्या यशस्वी पत्रकारितेबद्दल त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी मंत्री डी.पी.सावंत म्हणाले की, डॉ.शंकरराव चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण उर्दू भाषेत झाले. त्यांचे मराठी, इंग्रजी, तेलुगू यासह उर्दू भाषेवर प्रभुत्त्व होते. उर्दू भाषेच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांच्यानंतर नांदेडमध्ये राज्यातील पहिले उर्दू घर बनवण्याचे काम माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली.
यावेळी अध्यक्षीय भाषणात एम.ए.माजिद यांनी उर्दू पत्रकारितेचा इतिहास सांगताना राष्ट्रनिर्मितीत उर्दू पत्रकारितेचे योगदान प्रतिपादित केले. यावेळी विनोद रापतवार, अल्ताफ सानी, शौकत नजफ यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ.इरशाद खान यांनी केले. सूत्रसंचालन अथहर कलीम केले. ‘मैफिल-ए-मुशायरा’नेे कार्यक्रमाची सांगता झाली.