

नांदेड(प्रतिनिधी)-हिंदु मुलींवर आणि नांदेडच्या एका मुलावर लव्हजिहाद आणि हत्याकांडाविरोधात आज एक भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जुन्या नांदेड भागातील समाजसेवक भोजालाल गवळी चौक, सराफा ते बर्की चौक, जुना मोंढा, महाविर चौक, वजिराबाद चौक, जुने शासकीय रुग्णालय असे चालत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत आला. मागील कांही महिन्यांमध्ये देशभरात घडलेल्या हत्याकांडांचा हा निषेध होता.
लव्ह जिहाद घटनांमध्ये वाढ झाली आहे. धर्मांतराला विरोध करणाऱ्या मुलींची हत्या झाली आहे. नांदेडमध्ये स्वप्नील नागेश्र्वर, लखनौ येथील निधी गुप्ता यांची हत्या झाली असे अनेक अन्याय करण्यात आले. या मोर्चामध्ये खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ.राजेश पवार, प्रविण साले, दिगंबर शिवाचार्य महाराज, दिलीपसिंघ सोढी, माधव पावडे, दिपकसिंह रावत यांच्यासह असंख्य संख्येत नागरीक, महिला, मुली, आदी सहभागी झाल्या होत्या. मोर्चाची मोठी संख्या पाहुन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे स्वत: जातीने या मोर्चात सहभागी झाले होते. जय श्रीराम…च्या घोषणांनी नांदेड दुमदुमले होते. जागो-जागी पोलीसांनी नागरीकांच्या गच्चींवर सुध्दा पोलीस उभे करून त्यांच्या हातात दुरबिनी दिल्या होत्या. जय श्रीरामसह वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा आसमंत दुमदुमून सोडत होत्या. विविध आशयांचे फलक लोकांच्या हातात होते.
याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनावर सकल हिंदु समाज नांदेड जिल्हा असे एक लेटरपॅडवर लिहिले असून त्यामध्ये हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल आणि हिंदुंच्या सुरक्षेची मागणी करत गुन्हेगारांना त्वरीत शासन व्हावे असे लिहिले आहे. या निवेदनावर फक्त दोन स्वाक्षऱ्या आहेत. त्या स्वाक्षऱ्या कोणाच्या आहेत हे ओळखू येत नाही.


ही मिरवणूक सुरू असतांना शहरातील जुना मोंढा भागातील फ्रेंडस जर्दा या दुकानाच्या फलकावर दगडफेक झाली. त्यात या दुकानाचे नाजुक फलक झटक्यात तुटले. या दुकानाचे मालक रियान सौदागर यांनी वास्तव न्युज लाईव्हला सांगितले की, दगडफेकीत दहा हजारांचे नुकसान झाले असावे.