नांदेड(प्रतिनिधी)-अवैध वाळू उपस्यावर कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या महसुल विभागाच्या पथकावर विट्टांनी हल्ला करून त्यांना पळवून लावणाऱ्या पाच जणांना नांदेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श.ए.बांगर यांनी तीन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 19 हजार 750 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.20 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 6 वाजता महसुल विभागातील विष्णुपूरीचे मंडळाधिकारी कोंडीबा माधव नागरवाड आणि त्यांच्यासह इतर अनिल धुळगंडे, मनोज देवणे, सचिन नरवाडे, प्रदीप पाटील, कैलास सुर्यवंशी, बालाजी सोनटक्के, जहीर खान हे पथक गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या लोकांविरुध्द कार्यवाही करण्यासाठी गेले असतांना त्यांनी आपली शासकीय गाडी क्रमांक एम.एच.26 आर.2611 ही एका जागी उभी केली आणि महसुल पथक नदीच्या काठाने पायी चालून अवैध वाळू उपस्याचे निरिक्षण करत असतांना जुन्या कौठा भागातील शुभम बालाजी जाधव (20) बबू अरुण जाधव (22), आकाश भगवान माने (30), धरम हनुमंत जाधव (21), भोला उर्फ रवी लक्ष्मण माने (26) या लोकांसह अनेकांनी या महसुल पथकावर वीटकरांनी हल्ला केला.
आपला जीव वाचवत महसुल पथक तेथून बाहेर निघाले. या दरम्यान हल्लेखोरांनी त्यांची सरकारी चार चाकी गाडी सुध्दा फोडली. या हल्यात एक विधीसंघर्षग्रस्त बालक सुध्दा सामील होता. नांदेड ग्रामीण पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 44/2020 दाखल केला होता. तत्कालीन पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख जावेद यांनी करून पाच जणांविरुध्द नियमित न्यायालयात आणि विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुध्द विधी मंडळाकडे दोषारोपपत्र दाखल केले.
जिल्हा न्यायालयात हा सत्र खटला क्रमांक 44/2020 या क्रमांकानुसार चालला. या खटल्यात एकूण 6 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालसमक्ष नोंदवले. उपलब्ध लेखी पुरावे सोबत दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश श.ए.बांगर यांनी या पाच जणांना तीन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकास 19 हजार 750 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी बाजू मांडली.पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पोलीस अंमलदार फय्याज सिद्दीकी आणि प्रकाश सुनकमवार यांनी पुर्ण केली.
नदीतून अवैधरित्या वाळू उपसा करून महसुल पथकावर हल्ला करणाऱ्या पाच जणांना सक्तमजुरी आणि 19 हजार 750 रुपये रोख दंड