नांदेड(प्रतिनिधी)-प्राध्यापिकेच्या घरातून 25 लाखापेक्षा जास्त रक्कमेची चोरी करणाऱ्या तीन पैकी एका चोरट्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.बिरहारी यांनी आज 5 डिसेंबरपर्यंत दुसऱ्यांदा पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.
डॉ.रत्नमाला धारबा धुळे (वानखेडे) या वसमत येथे प्राध्यापक आहेत. दि.10 मार्च 2022 रोजी त्या सकाळी 8 वाजता विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी वसमत येथे गेल्या आणि 3 वाजता परत आल्या. या दरम्यान त्यांचे घर चोरट्यांनी फोडले आणि त्यातून 4 लाख 44 हजारांचे सोन्याचे दागिणे चोरल्याची तक्रार दिली. त्यानंतर घरात पुर्ण तपासणी केली असता त्यांच्या घरातून एकूण 80 तोळे सोने, 25 तोळे चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा एकूण 25 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता असा पुरवणी जबाब डॉ.रत्नमाला धुळे यांनी 12 मार्च 2022 रोजी दिला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 79/2022 दाखल झाला.
पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते, दारासिंह राठोड आणि रामदास सूर्यवंशी यांनी मेहनत करून या प्रकरणाचा एक आरोपी संजय उर्फ समीर पंडीत नामनुर (24) रा.गुंडलवाडी ता.कळमनुरी जि.हिंगोली ह.मु.महेबुबनगर नांदेड यास पकडले. ही चोरी संजय नामनुर आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी मिळून केली आहे. संजय नामनुरला 2 डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी होती. यादरम्यान पोलीसांनी त्याच्याकडून 4 तोळे 7 ग्रॅम सोन्याचे दागिणे जप्त केले आहेत. तपासातील प्रगती पाहुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी संजय नामनुरची पोलीस कोठडी 5 डिसेंबरपर्यंत वाढवून दिली आहे.
प्राध्यापिकेच्या घरातून 25 लाखांपेक्षा जास्तची चोरी; एकाला अटक, काही सोन्याचे दागिणे जप्त