

नांदेड(प्रतिनिधी)-वाजेगाव पुलाजवळ तराफ्यांवर बिनधास्तपणे अवैध रेतीचा उपसा करून गोदावरी नदीपात्राचा सत्यानाश होत आहे. काही दिवसांपुर्वीच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रेतीवर रात्री कार्यवाही केल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. पण दिवसाढवळ्या तराफ्यांच्या सहाय्याने वाजेगाव परिसरात होणारा हा अवैध वाळू उपसा नांदेड ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत आहे. हे नव्याने नांदेड जिल्ह्यात आलेले जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना माहित असावे यासाठी हा छोटासा प्रयत्न.
आज दुपारी नांदेड जिल्ह्यातील एका जागरुक नगरीकाने वास्तव न्युज लाईव्हला काही फोटो पाठवले. या फोटोमध्ये नदी दिसते. एक पुल दिसतो आणि नदीच्या आसपास तराफे लागलेले आहेत. नदीच्या मध्यभागी तराफे उभे आहेत. सोबतच नदी काठावर असंख्य वाळूचे ढिग जमवलेले आहेत. वास्तव न्युज लाईव्हला फोटो पाठवणाऱ्या नागरीकाने याचे घटनास्थळ पाठवले नव्हते. म्हणून वास्तव न्युज लाईव्हने गुगल मॅपवर आलेल्या फोटोंना फिड करून त्याचे लोकेशन शोधले असता हे लोकेशन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वाजेगाव पुलाचे आहेे. यावरून हा अवैध वाळू उपसा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा ढवळ्या सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले. मुळात अवैध वाळू उपस्यावर कार्यवाही करण्याचे अधिकार महसुल प्रशासनाला आहेत. पण फौजदारी प्रक्रिया संहितेने पोलीसांना दिलेल्या भरपूर अधिकारांचा उपयोग पोलीस गुंडाविरुध्द, अवैध कामांविरुध्द कार्यवाही करतांना अत्यंत जोरदारपणे वापरतात. परंतू या ठिकाणी जेथे अवैधपणे नदीपात्राचा सत्यानाश करून वाळू उपसा होत आहे. त्या ठिकाणाकडे महसुल प्रशासन आणि पोलीस प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे वास्तव न्युज लाईव्हला फोटो पाठवणाऱ्या सर्वसामान्य नागरीकाने सांगितले. तरी गोदोवरी नदीपात्राचा पुर्ण सत्यानाश करून शहरातच होणारा वाळू उपसा थांबवा अशी विनंती नागरीकांच्यावतीने वास्तव न्युज लाईव्ह नांदेडचे नुतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उंबरठ्यावर करत आहे.
