नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी गावात एक घरफोडून चोरट्यांनी 5 लाख 16 हजार रुपयांचे दागदागिणे आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मरघाट येथे एक जबरी चोरी करण्यात आली आहे. मरखेल गावात एक बिअरशॉपीचे कुलूप तोडून त्यातून बिअर बाटल्या आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात तीन जागी मोटार सायकल चोरीचे गुन्हे घडले आहेत आणि एका जागी जनावर चोरीचा प्रकार पोलीस दप्तरी नोंद झाला आहे.
विजय गंगाधर उपलंचवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 डिसेंबरच्या दुपारी 4.30 ते 4 डिसेंबरच्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान कुंडलवाडी गावातील आठवडी बाजार गल्लीतील त्यांचे घर बंद करून ते सर्व कुटूंबिय लहान भावाच्या लग्नासाठी धर्माबाद येथे गेले होते. या संधीचे सोने चोरट्यांनी केले. त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाट चाबीने उघडले आणि कपाटातील 4 लाख 36 हजार रुपयांचे 109 ग्रॅम सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम 80 हजार रुपये असा एकूण 5 लाख 16 हजार रुयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.कुंडलवाडी पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक सुर्यवंशी यांच्याकडे देण्यात आला आहे.
मरखेल गावात एका बिअर शॉपीचे कुलूप कोणी तरी चोरट्यांनी चोरले आणि त्या दुकानातील 12 हजार 500 रुपये रोख रक्म आणि 32 बिअरच्या बॉटल्या 2 हजार 240 रुपये किंमतीच्या असा 14 हजार 740 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मरखेल पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार कदम अधिक तपास करीत आहेत.
शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरघाट येथे एका महिलेच्या घरात भिंतीवर चढून आत उतरलेल्या एका गुन्हेगाराने तिला खर्च करण्यासाठी पैसे देत अशी मागणी केली. महिलेने नकार दिल्यानंतर तिला लाकडाने मारहाण करून तिच्या कपाटातील 5 हजार रुपये रोख रक्कम त्या चोरट्याने चोरून नेली आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा जबरी चोरी या सदरात दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गणेश घोटके अधिक तपास करीत आहेत.
तसेच विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 40 हजार रुपये किंमतीची एक दुचाकी, रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 लाख 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी,भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 लाख रुपये किंमतीची दुचाकी गाडी आणि बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 70 हजार रुपये किंमतीचे पशुधन चोरून नेण्यात आले आहे.