नांदेड(प्रतिनिधी)-52 पत्याचा जुगार अड्डा उध्वस्त करत नांदेड ग्रामीण पोलीसांनी 560 रुपये रोख रक्कम जप्त केली. सर्वात मोठा जुगार अड्डा हाच होता. नांदेड ग्रामीणचे अत्यंत कर्तव्यदक्ष, कर्दनकाळ पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या नेतृत्वात केलेली ही कामगिरी प्रशंसनिय आहे.
हिम्मतपूर नाल्याजवळ बाभळीच्या झुडपात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास नांदेड ग्रामीण पोलीसांनी अत्यंत गुप्तपणे छापा मारला. या छाप्यादरम्यान त्या ठिकाणी एक रहेमान खान नावाचा माणुस आणि इतर तीन माणसे सापडली.त्यांच्याकडून 100 रुपयांच्या तीन नोटा, 50 रुपये दराच्या दोन नोटा आणि 20 रुपये दराच्या 2 नोटा आणि 10 रुपये दराच्या 12 नोटा असा 560 रुपये रोख रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ठिकाणी दोन कारपेट 1 हजार रुपयांचे, एक ग्रीन मॅट 500 रुपयांची, 20फुट काळे वायर आणि एक बल्प असा 220 रुपयांचा अतिरिक्त मुद्देमाल सुध्दा जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार विश्र्वनाथ देविदास पवार यांच्या तक्रारीनुसार रहेमतखान व इतर तिघांविरुध्द गुन्हा क्रमांक 719/2022 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) नुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार संभाजी व्यवहारे यांच्याकडे देण्यात आला आहे. पकडलेल्या आरोपींना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 41(1)(अ) ची नोटीस देवून सोडून देण्यात आले आहे.
