नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्यासह देशभरातील पोलीस विभागात असणाऱ्या “झिरो पोलीस’ बाबत नेहमीच अनेक लफडी समोर आली. नांदेड जिल्ह्यात सुध्दा असे अनेक प्रकार घडले आहेत. नांदेडचे नुतन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मात्र आपल्या सर्व अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत. त्यात पोलीस स्टेशनमध्ये झीरो पोलीस माझ्या नजरेस आला तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल असा प्रेमाचा सल्ला दिला आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये झिरो पोलीस असतात. या झिरो पोलीसांकडून बरीच कामे करून घेतली जातात. पोलीस ठाण्यात तर ही झिरो पोलीस अत्यंत नम्रतेने वागतात. पोलीस ठाण्यातील प्रत्येक पोलीस अधिकारी आणि प्रत्येक पोलीस अंमलदार त्यांचा मालकच असतो. परंतू पोलीस ठाण्याबाहेर गेल्यानंतर ही झिरो पोलीस मंडळी काय आतंक माजवते याची पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना कधीच कल्पना आली नाही. पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार आपल्या सेवेसाठी माणसे आहेत यावरच खुश असतात आणि त्यांचे काम चालवत असतात. पण झिरो पोलीस समाजाला मोठा घातक आहे. पोलीस ठाण्यातील सर्व कारभार यांच्या समक्षच चाललेला असतो. म्हणून त्यांना सर्व गुपीतेपण कळतात. अशा परिस्थितीत झिरो पोलीस हा भाग पोलीस विभागातीलच आहे असे जनता समजते आणि त्यांच्या जाचाला बळी पडते. काही झिरो पोलीस तर पोलीस निरिक्षकांचे वॉकीटॉकी आपल्या हातात घेवून गावभर पायी फिरत होते. पोलीस निरिक्षकांच्या मोबाईल व्हॅनमध्ये आपल्या बापाची गाडी असल्यासारखे बसून वावरत होते. या सर्वांचाच परिणाम बहुदा समाजावर घातक होतो आणि समाज गंडविल्या जातो. यातील काही विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या शेतात, घरी पोलीस अधिक्षक सुध्दा गेलेले आहेत आणि त्या फोटोंचा नंतर धंदा करण्यासाठी उपयोग करण्यात आलेला आहे.यामधील एक झिरो पोलीस सध्या तुरुंगात आहे. इतरांच्या पापाचे घडे भरणे शिल्लक आहे. याहीपेक्षा अनेक बाबी आहेत ज्या वास्तव न्युज लाईव्हला लिहिणे अशक्य आहे.
नुतन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या झिरो पोलीसांना नामशेष करण्याचे ठरवलेले आहे. या संदर्भाने एक महत्वाचा आदेश पारीत केला असून या आदेशात खाजगी व्यक्तींना कामासाठी वापर करत या झीरो पोलीसांबाबत आजच्या नंतर कोणीच असे झिरो पोलीस ठाण्यात ठेवणार नाहीत याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना वाटते की, या मंडळींमुळे पोलीस ठाण्यातील गुपीते बाहेर पडतील. म्हणून माझ्या निदर्शनास जर असा झिरो पोलीस कोठे आला तर त्याची मी गंभीर दखल घेईल असे आदेशात म्हणत पोलीस अधिक्षकांनी आपल्या ठाणे प्रभारी अधिकारी आणि इतर शाखांचे अधिकारी यांना प्रेमळ सल्ला दिला आहे.
…एस.पी.साहेब विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे काय?
पोलीस अधिक्षकांनी झिरो पोलीसांबाबत घेतलेली दखल नक्कीच अत्यंत प्रशसनिय आहे. काही वर्षांपुर्वी नांदेडच्या पोलीस अधिक्षक कार्यालयात सुध्दा या झिरो पोलीसामुळे माजलेले वादंग खुप गाजले होते. पण पोलीस अधिक्षक साहेबर विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे काय? त्यांना दिलेले ओळखपत्र परत घ्या, त्यांना दिलेले पत्र परत घ्या नाही तर हे विशेष पोलीस रस्त्यात अवैध वाहतुकीच्या गाड्या थांबवून त्यांच्याकडून खंडणी सुध्दा वसुल करत आहेत ती सुध्दा पोलीसांचीच बदनामी आहे. यावर सुध्दा आपण लक्ष केंद्रीत करावे अशी वास्तव न्युज लाईव्हची विनंती आहे.
झिरो पोलीसांवर कामकाज चालवणाऱ्यांवर आलेे गंडांतर ; पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचा उत्कृष्ट निर्णय