मारेकऱ्यांची पोलीस कोठडी तीन दिवसांसाठी वाढली
नांदेड(प्रतिनिधी)-1 डिसेंबर रोजी टायरबोर्ड, देगलूर नाका परिसरात झालेल्या खून आणि जीवघेणा हल्ला प्रकरणातील तीन आरोपींना आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश श.ए.बांगर यांनी तीन दिवस पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. याप्रकरणात आज या गुन्ह्याचे फिर्यादी अक्षय जमदाडे यांनी शपथपत्र देवून पोलीसांनी माझा जबाबा माझ्या सांगण्याप्रमाणे नोंदवला नाही असे नवीन ट्वीस्ट आणले आहे.
1 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास अक्षय साहेबराव जमदाडे, हर्षवर्धन सुभाष लोहकरे, अमोल भैय्या चावरे या तिघांवर तिक्ष्ण हत्याराने हल्ला झाला. याबाबत सुरूवातीला अक्षय जमदाडे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 706/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 307 व इतर कलमानुसार दाखल केला. या प्रकरणात शेख सोहेल उर्फ तलवार भाई शेख युसूफ (23), खुदबुद्दीन उर्फ शेख सोहेल शेख अनवर (22), शेख मजहर शेख युसूफ (25) या तिघांचा सहभाग होता असे तक्रारीत लिहिलेले आहे. त्या तक्रारीत मात्र ऍट्रॉसिटी कायदा जोडला नाही. त्यात भारतीय दंड संहितेचे कलम 307 होते म्हणजे त्याला ऍट्रॉसिटी जोडणे आवश्यक आहे. कारण तक्रार देतांना अक्षय जमदाडेने त्यात मी अनुसूचित जातीचा आहे असे लिहिलेले आहे. पण दुसऱ्या दिवशी 2 डिसेंबर रोजी त्यात ऍट्रॉसिटी कायदा जोडला गेला. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी 2 ते 6 अशी चार दिवस हल्लेखोरांना पोलीस कोठडी दिली. पोलीस कोठडीसाठी या आरोपींना आणण्याअगोदरच अक्षय चावरेचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यात भादवीचे कलम 302 ही जोडले गेले.
आज या तीन मारेकऱ्यांची पोलीस कोठडी संपली. पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी या तिन मारेकऱ्यांना न्यायालयात हजर केले. यावेळी एक ट्टिवस्ट आले जखमी आणि फिर्यादी अक्षय जमदाडे, दुसरा जखमी हर्षवर्धन लोहकरे हे दोघेही न्यायालयात आले होते. हर्षवर्धनला आजही उभे राहता येत नाही अशी त्याची शारिरीक परिस्थिती आहे. अक्षय जमदाडेने एक अर्ज पोलीस अधिक्षक कार्यालयात आणि शपथपत्र न्यायालयात पोलीस कोठडीच्या वेळी सादर केले. या दोन्हीमध्ये असे नमुद आहे की, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक श्री. घोरबांड साहेब यांनी मला अगोदर उपचार देण्याऐवजी मला पोलीस स्टेशनला बसून घेतले. तक्रार त्यांनीच लिहिली आणि मला फक्त सही करायला लावली.
माझी तक्रार माझ्या सांगण्याप्रमाणे लिहिलेली नाही. न्यायालयात मारेकरी आरोपींच्यावतीने एड शेख आमेर यांनी बाजू मांडली. फिर्यादी अक्षय जमदाडेच्यावतीने ऍड.जया ढवळे यांनी सादरीकरण केले. यानंतर न्या.श.ए.बांगर यांनी या तीन आरोपींना तीन दिवस अर्थात 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.
जखमी अक्षय जमदाडे आणि हर्षवर्धन लोहकरे यांच्यासोबत अनेक युवक न्यायालयात आले होते. त्यातील एक शिवाजी मधुकर सावळे यांनी वास्तव न्युज लाईव्हशी बोलतांना सांगितले की, जखमी झालेल्या युवकांना मीच घटनास्थळावरून दवाखान्यात नेले होते. त्यावेळी एक आरोपी पकडलेला होता. त्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी त्यास सोडून दिले आहे. या प्रकरणात ऍट्रॉसिटी जोडण्याचा प्रकार हा उशीरा केला आहे. त्यामुळे अशोक घोरबांड आणि त्यांचे सहकारी या गुन्ह्यात चुकीचा वेध घेत असल्याचा आरोप केला.