डॉक्टराच्या घरात चालणारा ऑनलाईन जुगार अड्डा; चार दिवसांनी गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी)- एका डॉक्टराच्या घरात सुरू असलेला ऑनलाईन जुगार अड्डा नांदेड ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून पकडला आहे. यात 2 लाख 82 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
नांदेड ग्रामीण येथील पोलीस उपनिरीक्षक माणिक देवराव हंबर्डे यांनी आपल्या काही सहकार्यांसह 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता चक्रधर ग्रामीण पॉलीटेक्नीक कॉलेजच्या पाठीमागे डॉक्टर शिवणकर यांच्या घरात छापा मारला. त्याठिकाणी अनेक संगणक, अनेक मोबाईल, अनेक पॅनकार्ड, अनेक आधारकार्ड, अनेक नोटबुक, डिजीटल वॉच, लॅपटॉप, चार्जर असे साहित्य पकडले. या साहित्याची किंमत 2 लाख 82 हजार 400 रूपये आहे. हा गुन्हा 5 डिसेंबरला घडला असता तरी नांदेड ग्रामीण पोलिसांनी 9 डिसेंबर रोजी दाखल केला आहे. त्याचे कारण पण लिहिले आहे की, मोबाईलमधील सिमकार्डचे एसडीआर आज सायबर सेल येथून प्राप्त झाल्यामुळे उशीर झाला आहे.
या प्रकरणात कुलदीप चंद्रकांत पाठसकर, शेख निसार, अमोल कोनगे, शालू जाधव आणि अप्पासाहेब आव्हाड अशा पाच जणांनी आरोपी करण्यात आले आहे. हा गुन्हा क्र. 725/2022 कलम 4 आणि 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे दाखल झाला आहे. या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्याची गरज नसते. त्यांना फक्त नोटीस देऊन सोडायची असते. या गुन्ह्याचा पुढील तपास करण्याची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे यांच्याकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *