भुकंप जनतेला कळला नाही, प्रसार माध्यमांनी प्रसिद्धीत आणला; अत्यंत कमी तीव्रतेचा भुकंप जनतेने घाबरू नये -अभिजीत राऊत

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात काही गावांना भुकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती संकेतस्थळावर दिसल्यानंतर वास्तव न्यूज लाईव्हने जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधला असता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या भुकंपाच्या धक्क्याची तीव्रता अत्यंत कमी आहे, असे सांगितले. रिश्टर स्केलवर या भुकंप धक्क्याची तीव्रता 3.0 मोजण्यात आली आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले.
मुदखेड तालुक्यातील पांढरवाडी, शेंबोली, तिरकसवाडी, नागेली या गावांमध्ये 9-10 डिसेंबरच्या रात्री भुकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्यांचे केंद्र पांढरवाडी असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. भुकंप झाला पण नागरिकांना त्याची जाणिव झाली नाही, पण संकेतस्थळावर माहिती समोर आल्यानंतर नागरिकांनी यावर प्रतिक्रिया दिली आणि ही प्रतिक्रिया काळजी घेण्यासारखी होती.
भुकंपाचे धक्के जाणवले, त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भुकंपशास्त्र विभागाचे प्रमुख टी. विजयकुमार यांनी संकेतस्थळावर दिसत असलेला भुकंपाचा रिश्टर स्केल चुकीचा असून संकेतस्थळावर दुरूस्ती केल्याचेही सांगितले.
भुगर्भात अनेक घडामोडी होत असतात. या घडामोडी होण्याची कारणे सुद्ध काही दृष्टीकोनातून आम्ही मानवच आहोत. आम्ही भुगर्भातून पाण्याचा उपसा करतो, तो अनियंत्रीत आहे. आम्ही डोंगरांना पोखरले आहे. डोंगरे आतपर्यंत भुगर्भात जोडलेली आहेत. आम्ही वृक्षांची कत्तल करताना कोणताच विचार करत नाही, त्यात फक्त स्वत:च्या सुविधांचा विचार असतो. आपल्यासाठीच सर्व काही आम्ही करतो आहोत, पर्यावरणाचा ऱ्हास करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, याचाही विचार होण्याची गरज आहे. काही बाबाींसाठी पर्यावरण विरोधात जात असताना त्याच पर्याय मात्र आम्ही कधीच तयार केला नाही आणि यामुळेच आम्हाला आज त्रास होत आहे. भुगर्भातून ज्या प्रक्रिया नैसर्गिक होतात त्या पुढेही होत राहतील. आता तरी आम्हाला पर्यावरणविषयी जागरूक होणे आवश्यक आहे
भुकंप झाला हे मुदखेड तालुक्यातील नागरिकांना तर कळलेच नाही, पण प्रसार माध्यमांनी संकेतस्थळावर माहिती पाहून माझा क्रमांक पहिला लागावा यासाठी भुकंपाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आणि जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. तेव्हा बातम्या प्रसिद्ध करताना सुद्धा बातमीमुळे त्याचा परिणाम समाजावर होणार नाही, याची जबाबदारी सुद्धा प्रसारमाध्यमांची आहे. अनेक प्रसारमाध्यमांनी बातमी प्रसारित केल्यानंतर वास्तव न्यूज लाईव्ह प्रसिद्धी देण्याचे यासाठीच ठरविले की, या भुकंपाच्या धक्क्याची तीव्रता ही नगण्य आहे, त्यामुळे जनतेने घाबरून न जाता दक्ष जरूर रहावे असे आम्हाला प्रसारित करायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *