नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कोठारी ता.किनवट येथील एका शेताच्या आखाड्यातील गोदामचे कुलूप तोडून त्यातील 40 क्विंटल सोयाबीन एका ट्रकमध्ये टाकून दरोडेखोरांनी नेले. त्यावेळी त्यांनी पिस्तुलचा धाक सुध्दा दाखवला होता.
ज्ञानेश्र्वर रघुनाथ गिते यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी किनवट न्यायालयात दाद मागितली होती की, 17 मे 2022 रोजी रात्री 3 वाजेच्यासुमारास त्यांचे कोठारी शिवारातील शेत सर्व्हे गट क्रमांक 134 मधील गोदाम तोडून दरोडेखोरांनी त्यांना मारहाण केली, त्यांच्याकडील हातोडीने गोदामाचे चार कुलूप तोडले आणि त्यातील 40 क्विंटल सोयाबीन बळजबरीने एक नंबर नसलेल्या ट्रकमध्ये टाकले आणि घेवून गेले. पोलीसात तक्रार दिली तर तुला गोळी मारतो असे सांगत त्या दरोडेखोरांनी ज्ञानेश्र्वर गितेवर पिस्तुल रोखले. न्यायालयाने या प्रकरणात किनवट पोलीसांना आदेश दिल्यानंतर किनवट पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 395, 427, 323, 504, 506, 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 239/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
मे महिन्यात 40 क्विंटल सोयाबीनवर दरोडा; न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल