नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ-मोठ्या हायवा गाड्या चोरून आणायच्या आणि एका मोठ्या गॅरेजमध्ये त्याचे तुकडे करून पुन्हा ते तुकडे एका ट्रॅकमध्ये भरायचे आणि ते तुकडे भरलेला ट्रक विक्रीसाठी पाठवून द्यायचा असा एक छुपा व्यवसाय सुरू होता. नांदेड जिल्ह्यातून सुध्दा बऱ्याच हायवा चोरीला गेलेल्या आहेत.या छुप्या धंद्यावर धाड टाकून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने हायवा आणून तुकडे केलेले साहित्य आणि चार जणांना ताब्यात घेतले आहे. आता प्रश्न हायवा चोरून आणणाऱ्या चोरट्यांचा आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक राज्यातील विविध ठिकाणी रवाना झाले आहेत.
कोठे-काय चालते याचा अंदाज कधीच येत नसतो. परंतू आपल्या हद्दीत काही बाबींवर बारकाईने लक्ष ठेवले तर त्या भागात सुरू असलेला कोणताही प्रकार पोलीसांपासून लपविणे अशक्य आहे. आज स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, गोविंदराव मुंडे, पोलीस अंमलदार राजू पुल्लेवार, गणेश धुमाळ, गंगाधर कदम, विठ्ठल शेळके आदींच्या पथकाने वाजेगाव परिसरात एका मोठ्या गोडाऊनमध्ये छापा टाकला. या गोडाऊनमध्ये अनेक घरगुती गॅस सिलेंडर, हायवा गाड्यांचे तोडलेले साहित्य आणि एक अख्या हायवा सापडला. हे सर्व साहित्य स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हायवा गाड्या तोडून त्याचे तुकडे करणारे चार जण स्थानिक गुन्हाशाखेने ताब्यात घेतले आहेत. हायवा चोरून नांदेडला आणणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे काही पथक राज्यातील विविध भागात रवाना झालेले आहे.

