अंतर जातीय-अंतर धर्मीय आणि पळून जावून केलेल्या विवाह संदर्भाने राज्य स्तरीय समितीची स्थापना

नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाने 13 डिसेंबर 2022 रोजी अंतर जातीय, अंतर धर्मीय विवाह समन्वय समितीची राज्य स्तरीय समिती गठीत केली आहे. त्यात एकूण 13 जणांची नावे आहेत.
महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत, अनोंदणीकृत विवाह धार्मिकस्थळी करण्यात आलेले विवाह, पळून जावून केलेले विवाह अशा प्रकारे अंतर जातीय, अंतर धर्मिय विवाह केलेल्या व्यक्तींची इत्मभुत माहिती प्राप्त करणे, नवविवाहित मुली, महिला तसेच त्यांच्या कुटूंबियांशी संपर्क करून सद्यस्थितीत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत किंवा कसे? याबद्दल माहिती घेणे. आई-वडील इच्छूक नसल्यास तज्ञ समुपदेशकाद्वारे त्यांचे समुपदेशन करणे तसेच त्यांच्यामधील वाद-विवादांचे निराकरण करणे ईत्यादी करीता एक व्यासपीठ उपलब्ध करून या बाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेण्याकरीता शासनाच्या महिला व बालविकास विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. त्या निर्णयानुसार अंतर जातीय, अंतर धर्मिय विवाह परिवार समन्वय समिती(राज्य स्तरीय) असे शिर्षक देण्यात आले आहे.
या समितीचे अध्यक्ष महिला व बालविकास विभागाचे मंत्री असतील. इतर सदस्यांमध्ये महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव. महिला व बालविकास आयुक्त पुणे, महिला व बालविकास विभाग मंत्रालयातील सहसचिव ऍड. योगेश देशपांडे नंादेड, संजीव जैन (संभाजीनगर), सुजाता संतोष जोशी (नाशीक), ऍड. प्रकाश साळसिगीकर (मुंबई), यदुगौडीया (नागपूर), मिराताई कडवे(अकोला), शुभदा गिरीश कामद(पुणे), योगीता साळवी(मुंबई) यांचा समावेश आहे. या राज्य स्तरीय समितीच्या सचिव सदस्य पदी उपायुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
ही समिती नोंदणीकृत विवाह, अनोंदणीकृत अंतरजातीय विवाह आणि अंतर धर्मीय विवाह, धार्मिकस्थळी करण्यात आलेले अंतर जातीय विवाह आणि अंतर धर्मिय विवाह आणि पळून जावून केलेले अंतर जातीय आणि अंतर धर्मिय विवाह याबाबत विभागीय आणि जिल्हास्तरावर बैठक घेवून या राज्य स्तरीय समितीच्यावतीने अशा प्रकरणांचा आढावा घेतील. या शासन निर्णयाचा क्रमांक विवाह-2022/ प्र.क्रं.218/का-02 दि.13 डिसेंबर 2022 असा आहे. नांदेडच्या एका व्हाटसऍप ग्रुपवर 13 डिसेंबर 2022 रोजी जारी झालेल्या या शासन निर्णयातील नांदेडचे सदस्य ऍड. योगेश देशपांडे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा पण सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *