नांदेड(प्रतिनिधी)-जिवघेणा हल्ला केल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी दखल घेतली नाही म्हणून तक्रारदाराने न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने सर्व हकीकत समजून घेतल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. 2020 मध्ये घडलेल्या घटनेचा गुन्हा आता दोन वर्षानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांना अखेर दाखल करावाच लागला.
मिर्झा तलहा बेग मिर्झा बेग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार धनेगाव परिसरात शेत गट क्रमांक 73/1 या जमीनीची पाहणी करण्यासाठी दि.24 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.30 वाजता गेले होते. ती जागा माळटेकडी उड्डाणपुलाजवळ आहे. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या दुर्गाचारी इष्टय्या चैनाजोलू (45) रा.चंदासिंग कॉर्नर, शेख अब्दुल सलीम शेख अब्दुल वाहेद मिरादातार रा.लेबर कॉलनी नांदेड, शेख युसूफ कौठेकर रा.वाजेगाव, शेख लतिफ रा.संभाजी चौक नांदेड आणि गंगाधर देशमुख रा.धनेगाव नांदेड अशा पाच जणांनी शेख तहला बेग यांना बोलावले आणि त्यांच्या वडीलांवर सुरू असलेल्या फौजदारी केस बाबत चर्चा करू असे सांगितले. त्यावेळी या लोकांनी शेख तलहाला पकडून रॉड, काठ्यांच्या सहाय्याने उड्डाणपुलावर नेऊन मारहाण केली. त्यावेळी त्यांना भरपूर मार लागला. त्यांचा पाय मोडला होता. या सर्व घटनेची दखल नांदेड ग्रामीण पोलीसांनी घेतली नाही म्हणून शेख तलहा यांनी न्यायालयात दाद मागितली.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर 24 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणाचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीसांनी आता 14 डिसेंबर 2022 रोजी गुन्हा क्रमांक 735/2022, भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 504, 506 आणि 34 नुसार दाखल केला आहे. नांदेड ग्रामीणचे सन्माननिय पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड यांच्या अत्यंत सक्षम नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक माणिक हंबर्डे अधिक तपास करीत आहेत.
