
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज सकाळी कवायतीसाठी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर बोलावून त्यांना शहरात जवळपास 30 ठिकाणी फिक्स पॉईंट ड्युटी करायला लावली. यातून आपल्याकडे उलपब्ध असलेल्या मनुष्यबळाचा उपयोग आपण कसा करू शकतो. याचे एक उत्कृष्ट उदाहरण त्यांनी दाखवले.
पोलीस दलात शुक्रवार हा दिवस कवायतीसाठी (परेड) निश्चित आहे. या दिवशी वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यातील अधिकारी, पोलीस अंमलदार हे सर्व एकत्रितपणे पोलीस मुख्यालयाच्या मैदावर जमतात आणि प्रशिक्षणापासून आजपर्यंत शिकलेली कवायत करतात. यातून शारिरीक स्वास्त आणि मानसिक स्वास्त वाढते हे तेवढेच खरे आहे. यासाठी पोलीस विभागातील प्रत्येक जण नेहमीच तयार असतो.
आज शुक्रवार आहे, आज सुध्दा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार कवायतीसाठी सकाळी 6.30 वाजता हजर झाले.नांदेड जिल्ह्याचे पोलीस प्रमुख श्रीकृष्ण कोकाटे हे सुध्दा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आले आणि त्यांनी जमलेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांची कवायत तयारी पाहिली आणि मध्येच थांबवली. आपल्या डोक्यातील कल्पना नव्याने त्यांनी या सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना सांगितली आणि त्यानुसार ही सर्व मंडळी सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंत शहरातील सहा पोलीस ठाण्याअंतर्गत जवळपास 30 ठिकाणी फिक्स पॉईंट ड्युटीला रवाना झाले. आज सकाळी 10 पर्यंत हे सर्व पोलीस अधिकारी अंमलदार फिक्स पॉईंट ड्युटीवरच होते.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी राबवलेली ही नवीन मोहिम सकाळी 7 ते 10 यावेळेत शहरात फिरणाऱ्या अनेक नागरीकांनी पाहिली. जवळपास सर्व शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस हजर पाहुन आम्ही सुरक्षीत आहोत ही भावना जनतेमध्ये जागृत झाली. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्या या नवीन कल्पनेतून राबवलेल्या या मोहिमेतून पोलीस तुमच्यासाठी, अर्थात जनतेसाठी सदैव तयार आहे हे दिसले.
