गुंठेवारी प्रकरणात दोन परवाना धारक अभियंते, दोन भुखंडधारक आणि एक मनपा कर्मचारी आरोपी सदरात

नांदेड(प्रतिनिधी)-गुंठेवारी कक्ष जळाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेचा कर्मचारी, दोन परवाना धारक अभियंते आणि दोन भुखंड धारक अशा पाच जणांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा नव्याने दाखल झाला आहे. यापुर्वी सुध्दा दोन गुन्हे दाखल आहेत.
नागरी वस्तीमध्ये बिना परवानगी झालेले बांधकाम पाडण्याचे अधिकार महानगरपालिकेला आहेत. शासनाने त्यात गुंठेवारी हा एक प्रकार अंमलात आणला आणि त्यातून तयार असलेल्या बांधकामांना हातोडा लावला जाणार नाही अशी एक प्रक्रिया तयार करण्यात आली. या प्रक्रियेमुळे अनेकांना फायदा झाला. नागरीकांनी सुध्दा या प्रक्रियेला प्रतिसाद दिला आणि आपल्या चुकलेल्या कामांसाठी गुंठेवारीच्या मदतीने त्यांना कायदेशीर करण्यासाठी पुढकार घेतला. एखादी प्रक्रिया अंमलात येते तेंव्हा त्यात खोटारडे पणा आपोआपच येतो आणि असाच खोटारडेपणा महानगरपालिकेतील गुंठेवारी प्रकरणांमध्ये सुरू झाला. गुंठेवारी संचिकांमध्ये सर्वात शेवटचा कागद गुंठेवारी प्रमाणपत्र हे आहे.
दि.15 डिसेंबर 2022 रोजी गुंठेवारी विभागातील कनिष्ठ अभियंता विजय शेषराव दवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांच्या कार्यालयातून दोन गुंठेवारी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले. या प्रमाणपत्रावर मुख्य अभियंता, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त अशा क्रमात स्वाक्षऱ्या असतात. या तिन्ही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या खोट्या आहेत. या प्रमाणपत्रांना जावक क्रमांक नोंदवून ते प्रमाणपत्र भुखंड धारकांना देण्यात पण आले.
या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 443/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 471 आणि 34 नुसार दाखल झाला. या गुन्ह्यांमध्ये दोन भुखंडधारक, दोन परवानाधारक अभियंता आणि एक महानगरपालिकेचा कर्मचारी आरोपी सदरात आहेत. त्यांची नावे कनिस फातेमा महम्मद मसुद सौदागर, असदुल्ला ईनायतुल्ला, शेख अहराज फराहन रियाज, दिलशाह कलीम आणि गंगाधर जाधव अशी आहेत. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार कदम यांच्याकडे देण्यात आला आहे.
गुंठेवारी कक्षाला आग लागल्यानंतर वास्तव न्युज लाईव्हने जिल्हाधिकाऱ्यांच्या खुलाशासह बातमीला प्रसिध्दी दिली होती. त्यानुसार संचिका तयार होतील हो पण खोट्या स्वाक्षऱ्या करून गुंठेवारी प्रमाणपत्र तयार करणाऱ्या गुन्हेगारांचे काय असा प्रश्न बातमीत उपस्थित केला होता. या गुन्हा क्रमांक 443 पुर्वी सुध्दा दोन असेच गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातील आरोपींना सुध्दा अद्याप अटक झालेली नाही आणि 443 क्रमांकाच्या गुन्ह्यातील आरोपींना सुध्दा अटक झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *