कंधार पोलिसांची कारवाई, गुन्ह्याची प्रक्रिया सुरु
कंधार (प्रतिनिधी)-कर्नाटकातून अवैद्यरित्या नांदेडात येणारा लाखो रुपयांचा ट्रकभर गुटखा येथील पोलिसांनी पकडला. ही कारवाई रविवारी सकाळी करण्यात आली असून सायंकाळी उशीरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महाराष्ट्र शासनाने उत्पादन, साठवणूक व विक्रीसाठी बंदी घातली आहे. परंतू नांदेड शेजारी असलेल्या आंध्रप्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सीमेवरून गुटख्याची तस्करी होत असल्याचे आता लपून राहिले नाही. यामुळे नांदेड जिल्हयात गुटख्याची गल्लीबोळात खुलेआम विक्री होत आहे. तस्करीच्या माध्यमातून कर्नाटकातून अवैद्यरित्या लाखो रुपयांचा गुटखा ट्रकमधून जांब मार्गे कंधार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनूसार पोलिस निरीक्षक रामा पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आदित्य लोणीकर यांच्या नियंत्रणाखाली पथकाने रविवारी सकाळी सापळा रचून एमएच ४३ यु १५२३ या क्रमांकाचा ट्रक पकडून ठाण्यात जमा करण्यात आला. हा गुटखा कोणी मागवला, कोण तस्कर आहेत, याचा तपास सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे लोणीकर यांनी सांगितले आहे.