हिमातनगर (प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलीसांनी एक विधीसंघर्षग्रस्त बालक, एक युवक दोघांना पकडून त्यांनी चोरी केलेल्या 4 लाख रुपये किंमतीच्या 6 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. तसेच एका 27 वर्षीय व्यक्तीकडून त्याने चोरी केलेली 9 हजार रुपये किंमतीची बॅटरी जप्त केली आहे.
हिमायतनगरचे पोलीस निरिक्षक बिरप्पा भुसनुर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार सिंगनवाड, शाम नागरगोजे, आऊलवाड, जिंकलवाड आदींनी शेख अबुजर शेख मुसा (19) रा.हिमायतनगर याला एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह ताब्यात घेतले. या दोघांनी मिळून वेगवेगळ्या कंपन्यांच्या सहा दुचाकी गाड्या चोरल्या होत्या. त्यातील एक गुन्हा हिमायतनगर येथे दाखल आहे. त्याचा क्रमांक 286/2022 असा आहे. या चोरट्या न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर हिमायतनगर पेालीसांनी त्यांच्याकडील सहा चोरलेल्या दुचाकी गाड्या जप्त केल्या त्या गाड्यांची एकूण किंमत 4 लाख रुपये आहे.
असाच एक दुसरा क्रमांक 274/2022 हिमायतनगर येथे दाखल होता. त्याप्रकरणात 9 हजार रुपये किंमतीची बॅटरी चोरीला गेली होती या प्रकरणात हिमायतनगर पोलीसांनी गोपाळ रामराव वटाणे (27) रा.कोपरा यास पकडले आणि त्याने चोरलेली 9 हजार रुपये किंमतीची बॅटरी जप्त केली आहे. हिमायतनगर पोलीसांंनी केलेल्या कामगिरीसाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे, अबिनाश कुमार, सहाय्यक पोलीस अधिक्षक शफकत आमना, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आदींनी कौतुक केले आहे.
