दयानंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यापीठस्तरीय आविष्कार-२०२३ महोत्सवाची सांगता
नांदेड (प्रतिनिधी)-आजच्या आधुनिक काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण संशोधनाच्या क्षेत्रात पुढे पाऊल टाकले पाहिजे. कारण युवकांमध्ये प्रचंड अशी शक्ती आहे. त्यांनी भरपूर वाचन, अभ्यास करून अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावीन्यपूर्ण संशोधन केले पाहिजे. संशोधन करताना प्रथमतः अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा जोमाने संशोधन केले पाहिजे. विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील व सर्वञ संशोधक वृत्ती वाढीस लागावी म्हणून आविष्कार महोत्सव नामांकित संस्थांशी झालेले सामंजस्य करार आदींच्या माध्यमातून विद्यापीठ कार्य करीत आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी संशोधन करून भारताचे नावलौकिक जागतिक स्तरावर करावे. त्याचबरोबर दयानंद विज्ञान महाविद्यालय व दयानंद शिक्षण संस्था ही विद्यापीठाकडून नेहमीच अग्रेसर गणली गेली आहे. या संस्थेनी क्लस्टर विद्यापीठ व्हावे, असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले.
दयानंद विज्ञान महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय आविष्कार-२०२३ महोत्सवाची सांगता दि.२१ डिसेंबर रोजी झाली. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी होते. याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड, उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, ‘स्वारातीम’ विद्यापीठ, उपकेंद्र लातूरचे संचालक डॉ. राजेश शिंदे, आविष्कार विद्यापीठ समन्वयक डॉ. संजय पेकमवार व डॉ. कोमल गोमारे,विद्यापीठातील सहाय्यक कुलसचिव डॉ. सरिता यन्नावार, सहसमन्वयक डॉ. शैलेश पटवेकर, डॉ. जी.कृष्णा चैतन्य, डॉ.महादेव पंडगे आणि सौ.मिराताई भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी असे म्हणाले की, भारतीय संशोधनाचा आढावा घेतला असता जागतिक स्तरावर आपण खूप मागे आहोत. परंतु हा संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी महाविद्यालय, विद्यापीठ आणि शासन स्तरावर योग्य ते प्रयत्न केले तर नवयुवक संशोधकांच्या नवीनतम संशोधनाच्या जोरावर भारताचे नावलौकिक देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर झळकेल. समाजोपयोगी केलेले संशोधन हे मार्केटमध्ये आले पाहिजे. ज्याप्रमाणे भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ गणली जाते, त्याचप्रमाणे नवयुवक संशोधक संशोधनाच्या क्षेत्रात भारताचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल करतील.
विद्यापीठस्तरीय आविष्कार चे आयोजन करण्याची संधी दयानंद विज्ञान महाविद्यालयास दिली त्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच दयानंद शिक्षण संस्था ही विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांना नेहमी प्रोत्साहन देत मार्गक्रमण करीत आहे करीत राहील असे ते म्हणाले.
प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड असे म्हणाले की, दयानंद शिक्षण संस्था महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वेगवेगळे उपक्रम, इन्स्पायर कॅम्प, रिफ्रेशर कोर्स,पीएच.डी.कोर्स वर्क, भटनागर, पद्मभूषण आवर्डी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदिं उपक्रम राबविते. विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. म्हणूनच संशोधकांनी संशोधनाचा पाया भक्कम करून नावीन्यपूर्ण संशोधन करून भारताला महासत्ता बनवले पाहिजे, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी असे म्हणाले की,विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला निश्चितच नवसंजीवनी मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळेच संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी म्हणून स्पर्धेत क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये देत आहे. आणि दयानंद शिक्षण संस्थेचा क्लस्टर विद्यापीठ होण्याचा निश्चितच मानस आहे,असे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुण्याचा परिचय व सूत्रसंचालन प्रा. मेघा पंडित यांनी केले तर समन्वयक डॉ. कोमल गोमारे यांनी आभार मानले. यावेळी परीक्षक म्हणून सोलापूर विद्यापीठाचे संचालक डॉ. सचिन लड्डा आणि संशोधक विद्यार्थ्यांमध्ये गौरी कन्हेरे व ओंकार जाधव यांनी आविष्कार महोत्सवातील आपले अनुभव व्यक्त केले. डॉ.संजय पेकमवार यांनी संशोधन महोत्सवाचा आढावा व बक्षीस वितरणाचे वाचन केले. परीक्षक व विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. आविष्कारमध्ये प्रत्येक कॅटिगीरीमधून प्रथम येणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांस ३१०० रुपये देण्यात आले. याप्रसंगी नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यातील विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील ७८ संशोधक विद्यार्थी, मार्गदर्शक, परीक्षक, ग्रंथपाल प्रा. किरण भिसे, आविष्कार पोर्टफोलिओ सदस्य प्रा. पूजा नगिमे, प्रा.मयूरी जाधव, डॉ.महेश कराळे, डॉ.विश्वनाथ मोटे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.