1 कोटी 18 लाखांचे तोडलेल्या गाड्यांचे सुटे भाग आणि काही गाड्या जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-मोठ्या किंमतीच्या हायवा गाड्या चोरून त्याची विक्री करणाऱ्या काही जणांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडून जवळपास 7 गुन्ह्यांची उकल केली आहे. या वाहन चोरी करणाऱ्या मंडळींकडून 1 कोटी 18 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातून हायवा गाड्या चोरीला गेल्याचे अनेक गुन्हे घडले होते. त्यातील चोरट्यांचा पत्ता मात्र लागत नव्हता. दोन दिवसांपुर्वीच स्थानिक गुन्हा शाखेत आपल्या कारर्किदीचे तिसरे वर्ष सक्षमपणे पुर्ण करणारे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मौजे वांगी ता.जि.नांदेड येथील लखन अवधुत जाधव (22) यास ताब्यात घेतले. त्याचे साथीदार जर्नाधन उर्फ गजानन काळे रा.जालना, मेहराज सय्यद रा.औरंगाबाद, विष्णु आखात रा.जालना, प्रभु बामणे रा.जालना, लक्ष्मण गाडे रा.पाचोड जि.औरंगाबाद आणि हरी मखमले रा.जालना या सर्वांच्या मदतीने नांदेड जिल्ह्यातून 6 आणि हिंगोली जिल्ह्यातून 1 हायवा टिपर वाहन चोरी केले होते. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी जर्नाधन उर्फ गजानन काळे, मेहराज सय्यद रा.औरंगाबाद यांना ताब्यात घेतले. लखन जाधव याच्याकडून एक, मेहराज सय्यद याच्याकडून दोन, जर्नाधन उर्फ गजानन काळेकडून तोडलेल्या स्थितीतील गाड्यांचे सुट्टे भाग असे पाच हायवा गाड्यांचे चोरीचे साहित्य जप्त केले आहे. सोबतच हायवा वाहने चोरी करण्यासाठी वापरलेली चार चाकी गाडी सुध्दा जप्त केली आहे. जप्त केलेल्या ऐवजाची एकूण किंमत 1 कोटी 18 लाख रुपये आहे.
या चोरट्यांना पकडल्यामुळे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 505/2022, दुसरा गुन्हा क्रमांक 314/2022, पोलीस ठाणे हदगाव येथील गुन्हा क्रमांक 291/2022, पोलीस ठाणे रामतिर्थ येथील गुन्हा क्रमांक 189/2022, पोलीस ठाणे देगलूर येथील गुन्हा क्रमांक 545/2022, पोलीस ठाणे उस्माननगर येथील गुन्हा क्रमांक 190/2022 आणि पोलीस ठाणे वसमत जि.हिंगोली येथील गुन्हा क्रमांक 285/2022 असे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. पकडलेल्या वाहन चोरांना पुढील तपासासाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
हायवा सारखे मोठे आणि महागडी किंमत असलेली वाहने चोरून त्याचा चुरा करून सुटे भाग विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दा फाश करणाऱ्या पथकाचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, श्री.गोविंदरावजी मुंडे साहेब, श्री.संजयजी केंद्रे साहेब, गंगाधर कदम, देवा चव्हाण, मोतीराम पवार, रणधिर राजबन्सी, बजरंग बोडके, अर्जुन शिंदे, शेख कलीम यांचे कौतुक केले आहे.