नांदेड(प्रतिनिधी)-नुतन पोलीस अधिक्षकांच्या कामकाजाचा पहिल्याच महिन्यात नांदेड जिल्हा पोलीस दलाने सीसीटीएनएस कामगिरीमध्ये महाराष्ट्र राज्यात 307 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या पुर्वी सलग तीन वेळा द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता.
नुतन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्याचा कार्यभार सांभाळल्यानंतर पहिल्याच महिन्यात 2022 मध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलाने सीसीटीएनएस कामगिरीमध्ये 342 गुणांपैकी 307 गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथून राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीसीटीएनएस कामगिरीचे अवलोकन करण्यात येते. त्यानुसार नोव्हेंबर 2022 मध्ये नांदेड जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली.
नांदेड जिल्ह्यात 36 पोलीस ठाणे आहेत. त्यातील प्रथमखबर, घटनास्थळ पंचनामे, आरोपी अटक, मालमत्ता जप्ती, दोषारोपपत्र, न्यायालयीन निकाल, हरवलेले व्यक्ती, अनोळखी मयत, अदखल पात्र खबर, गहाळ व बेवायर मालमत्ता, प्रतिबंधात्मक कार्यवाही अशा एकूण 18 प्रकारच्या माहितीची नोंद सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये केली जाते. आयटीएसएसओ, आटीजेएस, सीआरआय-मॅट पोर्टलचा प्रभावी वापर करून गुन्हे उघडकीस आणण्यात भरीव कामगिरी केली. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सीसीटीएनएस नोडल अधिकारी अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आणि सीसीटीएनएस पथकातील पोलीस उपनिरिक्षक रहिम बशीर चौधरी, प्रणिता राजाराम बाभळे, पोलीस अंमलदार समीर खान मुनीर खान पठाण, ओंकार राजेश पुरी, माधव नारायण येईलवाड यांच्या परिश्रमानेच नांदेड जिल्ह्याने हा प्रथम क्रमांक मिळवला आहे.
सीसीटीएनएस कार्यप्रणालीत नांदेड जिल्हा पोलीस राज्यात अव्वल