नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध चोऱ्या करणाऱ्या एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून एकूण 5 गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेल्या ऐवजापैकी 10 लाख 5 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करून देगलूर पोलीसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
दि.1 डिसेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान देगलूर शहरातील शारदानगर येथील रहिवासी दिनेश संगमनाथ मुनगिलवार हे पुणे येथे गेले होते. त्यांच्या घरातून चोरट्याने चांदीचे नाणे, सोन्याची नथ, चॉंदीचे शिक्के, सोन्याच्या पाटल्या आदी चोरून नेल्या होत्या. तसेच भायेगाव रोड देगलूर येथील हणमंत खंडू गायकवाड यांच्या घरातून 12 डिसेंबर रोजी असेच साहित्य चोरीला गेले होते. पुढे राम हनमंत पाटील रा.साईनगर देगलूर यांच्या घरातून आणि त्यांच्या शेजारच्या बालाजी एकलारे यांच्या घरातून मोठा ऐवज चोरीला गेला होता.
या संदर्भाने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनात देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांच्या नेतृत्वात देगलूरचे पोलीस निरिक्षक सोहन माछरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक माळाळे, पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत मोरे, पुनम सुर्यवंशी, पोलीस अंमलदार कृष्णा तलवारे, सुधाकर मलदौडे, संजय यमलवार, नामदेव मोरे, शेख जावेद, महाजन आणि बेग यांनी विविध पथकांच्या माध्यमातून अशी माहिती काढली आहे की, देगलूर शहरात राहण्यासाठी नवीन व्यक्ती कोण आला आहे आणि त्याची शोधा-शोध सुरू झाली. पोलीस पथकाला मुकूंदनगर देगलूरमध्ये तो नवीन माणुस सापडला. त्याचे नाव राजु गंगाराम बसवे (39) असे आहे. त्याच्या घराची झडती घेतली असता तेथे चोरी गेलेल्या साहित्यातील टी.व्ही. गॅस सिलेंडर, टेपरिकॉर्डर, तीन शालु, अनेक साड्या, वॉटर हिटर, दोन बेडशिड, एक तांब्याचा कळस, सफारी सुट, मोबाईल, टी.व्ही.चांदीचे वाळे, चांदीचे चैन असा एकूण 10 लाख 5 हजार 500 रुपयांचा चोरीचा ऐवज सापडला. देगलूर न्यायालयाने राजू गंगाराम बसवेला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरिक्षक सोहन माछरे हे करीत आहेत. सोहन माछरे यांनी आणखी बरेच चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देगलूर पोलीसांचे कौतुक केले आहे.