नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड येथे कार्यरत सध्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांची नेमणूक कार्यकारी पदावर कशी केली याबाबत चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव सुरेश नाईक यांनी दिले आहेत. या संदर्भाची तक्रार आ.शामला पाडवी यांनी केलेली होती.
30 डिसेंबर रोजी अवर सचिव सुरेश नाईक यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाने बोगस जात प्रमाणपत्र धारक अधिकारी आणि कर्मचारी यांना संरक्षण न देणे बाबत आदेश दिलेले असतांना सुध्दा नांदेड येथील जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण यांची कार्यकारी पदावरी नेमणूक का केली याबाबत हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सुचना क्रमांक 1346 नुसार लतिफ पठाण यांच्याविरुध्द एकंदरीत सर्व तक्रारींची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल शासनाला तात्काळ सादर करावा असे लिहिले आहे. हा आदेश विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना पाठविण्यात आला असून माहिती आणि आवश्यक कार्यवाहीसाठी या आदेशाची एक प्रत जिल्हाधिकारी नांदेड यांना सुध्दा पाठविण्यात आली आहे.
लतिफ पठाण पुर्वी उपविभागीय अधिकारी असतांना त्यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आलेल्या आक्षेपानंतर अशा अधिकाऱ्यांना कार्यकारी पदावर नियुक्ती देवू नये अशी सुचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यावेळी अशा डजनभर अधिकाऱ्यांची नावे त्यात होती. तरी पण लतिफ पठाण यांना पुढे नांदेड जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी अशा महत्वाच्या कार्यकारी पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांची कार्यकारी पदावरील नियुक्तीबाबत चौकशी होणार