उमेदवारांनी दक्षता बाळगावी-पोलीस दलाचे आवाहन
नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे.नांदेड मध्ये होण्यासाठी आलेल्या एका युवकाकडे ऑक्सीबुस्टर नावाची औषधी बॉटल आणि एक सिरिंज सापडली. पोलीस उपनिरिक्षक डाकेवाड आणि त्यांच्या सोबतच्या पाच पोलीस अंमलदारांच्या चाणाक्ष नजरेने हे शक्तीवर्धक औषध शोधले.
पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार दि.2 जानेवारीपासून नांदेड जिल्हा पोलीस दलाची भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया सकाळी 5 वाजल्यापासून पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर सुरू होत असते. दि.6 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास कागदपत्र तपासणी करून पुढे बायोमॅट्रीक चाचणी करण्यात येत होती आणि त्यानंतर उमेदवारांना मुख्य मैदानात शारीरिक चाचणीसाठी सोडण्याची प्रक्रिया सुरू होती. या दरम्यान एक उमेदवार लघुशंकेचे कारण दाखवून बाथरुमकडे गेला. पोलीस भरती प्रक्रियेत सर्व व्यवस्था उत्तम राखण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत. त्यातील पोलीस उपनिरिक्षक डाकेवाड आणि त्यांच्या पाच सहकारी पोलीस अंमलदारांना त्या लघुशंकेसाठी गेलेल्या उमेदवारावर संशय आला. या पोलीस पथकाने त्या उमेदवारावर बारकाईने नजर ठेवली आणि त्या उमेदवाराने लपवलेली एक सिरिंज व ऑक्सीबुस्टर नावाची औषधी बॉटल सापडली. पोलीसांनी या उमदेवाराला भरती प्रमुखासमोर हजर केले. भरती समितीने त्या उमेदवारास भरती प्रक्रियेतून अपात्र ठरविले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत कामकाज सुरू आहे.
पोलीस विभागाने या माहितीसोबत आवाहन केले आहे की, पोलीस भरती प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांनी पोलीस भरतीला येतांना कोणतेही संशयास्पद, उत्तेजनार्थ द्रव्य घेवू नये, तसेच सोबत सुध्दा बाळगु नये. सर्व उमेदवारांची बायोमॅट्रीक आणि परंपरागत तपासणी करून पुढील भरती प्रक्रियेसाठी परवानगी देण्यात येत आहे. अचानकपणे कोणत्याही उमेदवाराचे रक्ताचे नमुने, लघवीचे नमुने घेण्यात येत असून त्यांच्या रक्त किंवा लघवीच्या नमुन्यात काही संशयीत घटक आढळून आल्यास त्या उमेदवारास पोलीस भरती करीता अपात्र ठरविण्यात येणार आहे.