लातूर(गोपीकिशन पिपलवा)- महाराष्ट्र प्रदेश खांडल विप्र संघटनेच्या तिसऱ्या कार्यकारी बैठकीमध्ये जुने मडे काढू नका. नवीन कामाची सुरूवात करूया असे सांगत महाराष्ट्र प्रदेश खांडल विप्र संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश रुथळा यांनी या बैठकीची सांगता भगवान श्री. परशुराम की जय या घोषणेने केली.
आज लातूर येथे महाराष्ट्र प्रदेश खांडल विप्र संघटनेच्या कार्यकारणीची तिसरी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत इचलकरंजी येथे संपन्न झालेल्या कार्यकारणीच्या वृत्ताला मंजुरी द्यायची होती. प्रदेश संघटनेची नवीन नोंदणी करण्याबाबतचा विषय होता. खांडल विप्र संघटनेच्या संकेतस्थळाचे लोकार्पण आणि त्याद्वारे जनगणनेचा विषय होता. आजीवन सदस्य आणि शाखा अध्यक्षांना मत देण्याचा अधिकार निश्चित करणे आणि आजीवन सदस्यांमध्ये वाढ करणे. शाखा सभा कार्यकाळ महासभा नियमावलीनुसार दोन वर्षांचा आहे. त्यातील अध्यक्ष दोनवेळेसच राहावा असे आहे. शाखा सभांची निवडणुक विहित वेळेत व्हावी. त्याची निवडणुक प्रक्रिया कार्यान्वित करण्याचा विषय होता. महासभेच्या सहयोगाने पुण्यात वस्तीगृह तयार करण्याचा विषय होता. तसेच प्रदेशाध्यक्षाच्या अनुमतीने ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा होणार होती.
या विषयांसह सुरू झालेल्या कार्यकारणी बैठकीत कार्यकारणीचे सनदी लेखाकार दामोदर काछवाल हे मागील अनेक वर्षापर्यंत प्रदेश संघटनेचे कोषाध्यक्ष होते. त्यांनी सांगितले की, संघटनेची घटना एवढी तकलादु आहे की, त्यात दोन पॅन कॉर्ड आहेत. सोबतच संघटनेचे दोन बॅंक खाते आहेत. या परिस्थितीत हे सर्व कामकाज कायद्याच्या विरुध्द आहे असे अनेक सदस्यांनी सांगितले. सोबतच मी मागील दोन प्रदेशाध्यक्षांना ऑडीट रिपोर्टच्या प्रति दिल्या आहेत. याप्रसंगी मागील दोन्ही अध्यक्षांनी ऑडीट रिपोर्ट मिळाले नाहीत असे स्पष्टपणे जाहीर कार्यकारणी बैठकीत सांगितले. यावर वेगवेगळ्या उच्च ध्वनीमध्ये अनेक चर्चा झाल्या आणि त्या चर्चानंतर सनदी लेखापाल दामोदर काछवाल यांनी सांगितले की, मी मागील 2005-2006 पासून कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहे. मी पुढील आठ दिवसांत ऑडीट रिपोर्ट पुन्हा उपलब्ध करून देतो आणि त्यानंतर प्रदेश संघटनेची नवीन घटना तयार करा त्या घटनेत काय हवे, काय नको याचा सविस्तर अभ्यास करा आणि नवीन बॅंक खाते उघडा अशी सुचना केली. प्रदेश संघटनेची नवीन घटना तयार करतांना कार्यकारणीची बैठक घ्या आणि ती बैठक अमरावती येथे आयोजित करा त्या बैठकीचे यजमान पद मी स्विकारतो. या बैठकीमध्ये आजच्या पुर्वीच्या सर्व अध्यक्षांनी उपस्थित राहावे अशी अपेक्षा दामोदर काछवाल यांनी व्यक्त केली.
प्रदेश संघटनेचे सरचिटणीस शांतीलाल काछवाल यांनी मागील हिशोबावर उचललेल्या आक्षेपांवर बोलतांना प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश रुथळा यांनी जुने मडे उकडून काढू नका नवीन कामावर लक्ष द्या असे सांगून त्यांचे मुद्दे रद्द केले. विषय पत्रिकेतील इतर विषयांवर मान्यताच झाली. पण त्यातून सकारात्मक काहीच निर्णय समोर आला नाही. खांडल समाजाचे संकेतस्थळ सुरू झाले आहे. एवढाच एक आनंदाचा विषय या बैठकीत दिसला. इतर सर्व विषय हे भविष्याचे आहेत आणि भविष्यातील विषयांवर आजच सकारात्मक निर्णय अवघड असतो.
नांदेडच्या मुख्य खंडेलवाल समाजाच्यावतीने काही सदस्यांनी नांदेडच्या निवडणुकीचा विषय लेखी स्वरुपात पाठविला होता. सोबतच प्रदेश संघटनेवर विधी सल्लागार असलेल्या ऍड.मनिष रामेश्र्वर खांडील (शर्मा) यांना त्या पदावरून कमी करावे असा दुसरा लेखी अर्ज सुध्दा प्रदेश संघटनेकडे पाठविला होता. परंतू त्या अर्जांना बैठकीच्या विषयात सामील करण्यात आले नाही.
नांदेड येथील प्रदेश संघटनेचे दोन सदस्य द्वारकादास माटोलीया आणि ऍड. दिपक बढाढरा हे सुध्दा या बैठकीत सामील होते. पण नांदेडच्या विषयांवर त्यांनी “ब्र’ शब्द सुध्दा काढला नाही. इतर विषयांवर मात्र आपले सकारात्मक मत दाखवतांना ऍड. दिपक बढाढरा माईक हातात घेवून जोरदार सादरीकरण करत होते.