मध्यरात्री बाफना पुलावर महिलेवर गोळीबार

नांदेड(प्रतिनिधी)-मध्यरात्री बाफना ब्रिजवर एका महिलेच्या दंडात तीन जणांनी मिळून गोळी मारल्याचा प्रकार घडला आहे. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी परभणी येथील दोन आणि एक अनोळखी अशा तीन लोकांविरुध्द इतवारा पोलीसांनी जीवघेणा हल्ला या सदरात गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार सविता गायकवाड नावाच्या महिला रात्री 11 वाजता शांतीनगर ते मगनपुरा जाण्यासाठी आपल्या दुचाकीवरून निघाल्या. रात्री11.15 वाजेच्यासुमारास त्या बाफना उड्डाणपुलावरून जात असतांना त्या ठिकाणी त्यांना रहिम खान आणि जफर तसेच तिसरा एक अनोळखी अशा तिघांनी थांबवले.रहिम खानची ओळख असल्यामुळे सविता गायकवाड थांबल्या. या संदर्भाची सविस्तर पार्श्र्वभूमी अशी की, एक आयचर खरेदी विक्री संदर्भाचा भारतीय दंड संहितेतील कलम 379 प्रमाणे भोकर पोलीस ठाण्यात सविता गायकवाड आणि आतिक नावाच्या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल आहे. त्यातील आतिकला अटक झाली होती. सविता गायकवाड यांना 14(1)(अ) फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे नोटीस देवून सोडण्यात आले होते. त्या गुन्ह्यात परभणी येथील रहिम खान हा व्यक्ती साक्षीदार आहे. त्यानंतर सविता गायकवाड यांनी आपल्या ओळखीच्या फैसल सोबत 7 जानेवारी रोजी परभणीला गेल्या. तेथे त्या रहिम खानच्या घरात गडबड केली. या संदर्भाचा गुन्हा परभणी येथे भारतीय दंड संहितेच्या कलम 452, 323, 506 प्रमाणे सविता गायकवाड आणि फैसल विरुध्द दाखल आहे.
यानंतर काल रात्री हा प्रकार घडला. दोन दुचाकी गाड्यांवर हे तिन लोक होते असे सविता गायकवाड यांनी पोलीसांना दिलेल्या जबाबत सांगतले आहे. त्यातील रहिम खान आणि जफर या दोघांना सविता गायकवाड ओळखतात. तिसरा आरोपी अनोळखी आहे. तु आम्हाला त्रास देत आहेस असे सांगून रहिम खानने सविता गायकवाडवर बंदुकीतून गोळी चालवली ती गोळी त्यांच्या दंडाच्या आरपार गेली. त्यांनतर त्यांनी इतवाराचे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांना मोबाईलवरून ही माहिती दिली. तेंव्हा पोलीस विभागानेच त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आपल्याच गाडीतून नेले. दवाखान्यात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी भेट सविता गायकवाड यांची विचारपुस केली. घटनास्थळी सुध्दा सर्व वरिष्ठ अधिकारी गेले होते.
सविता गायकवाड यांनी दिलेल्या जबाबानुसार इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 12/23 भारतीय दंडसंहितेच्या कलम 307, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांच्याकडे देण्यात आला आहे. घटनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी शेख असद यांना दुरध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, घटना घडली त्या ठिकाणी जवळपास कोठेच सीसीटीव्ही उपलब्ध नाही. त्या मार्गांच्या दोन्ही बाजुंचे जास्तीत जास्त सीसीटीव्ही फुटजे तपासून मी या गुन्ह्याला न्याय देईल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *