नांदेड(प्रतिनिधी)-तुरूंगातून न्यायालयात तारखेसाठी आलेल्या एका दरोड्यातील गुन्हेगाराने न्यायापीठावर चप्पल भिरकावल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश शशीकांत बांगर यांनी त्या चप्पल भिरकावलेल्या गुन्हेगाराला तुरंत न्याय देत सहा महिने शिक्षा आणि एक हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. खरे तर या प्रकरणातील कट कोणी रचला होता हे शोधणे आवश्यक आहे अशी चर्चा न्यायालय परिसरात होती.
तुरूंगात असलेल्या अनेक आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेसाठी पोलीस न्यायालयात आणतात. आज दत्ताहरी हंबर्डे (23) या गुन्हेगाराला पोलीसांनी न्यायालयात आणले होते. आज त्याच्या प्रक्रियेत साक्ष होणार होती. या दत्ता हरी हंबर्डे सोबत विकास हटकर, राजू हंबर्डे, विश्र्वंभर हंबर्डे आणि प्रभाकर थोरात हे सुध्दा दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपी आहेत. हा गुन्हा सन 2020 मध्ये घडलेला आहे.
आज न्यायालयात आणल्यानंतर दत्ताहरी हंबर्डेने चप्पल न्यायपिठाकडे भिरकावली. ही न्यायालयाची बेअदबी होती न्यायालयाने यावर त्वरीतच निर्णय घेतला आणि त्याला 6 महिने शिक्षा आणि 1 हजार रुपये रोख दंड ठोठावला. या दत्ताहरी हंबर्डेसोबत इतर गुन्हेगारांपैकी विकास हटकरला दोन वेगवेगळ्या सत्र खटल्यांमध्ये दहा-दहा वर्षाची शिक्षा झालेली आहे. इतरांची जामीनीवर मुक्तता झालेली आहे.
घटना घडल्यानंतर दत्ताहरी हंबर्डे सांगत होता की, माझे न्यायपीठ बदलण्यासाठी तुरूंगात सहा दिवस उपोषण केले आहे. सोबतच तो मी नाही त्यातली असा आव आणत होता. सांगत होता की, माझ्या दोन्ही चपला तर पायात आहेत तेंव्हा मी चपल कशी मारली. घडलेला प्रकार न्यायदालनात असलेल्या सर्वांनी पाहिलेला आहे. न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्याविरुध्द अनेक आरोपींनी न्यायपीठ बदलण्यासाठी प्रयत्न केले आहेत पण कोणालाही यश आलेले नाही. त्यातील एक खटलामात्र वर्ग झालेला आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल न्यायालय परिसरात चर्चा होत होती की, या प्रकरणामागील खरा कट कारस्थान रचणारा कोण आहे याचा शोध होणे आवश्यक आहे. न्यायालय परिसरात सुध्दा बिभिषण वावरतात या आशयाचे वृत्त वास्तव न्युज लाईव्हने मागे प्रसिध्द सुध्दा केले होते.
दरोड्यातील आरोपीने न्यायपिठावर भिरकावली चप्पल; त्वरीत प्रभावाने शिक्षा