
नांदेड(प्रतिनिधी)-आज सकाळी 11 वाजता रेल्वे स्थानकात अतिरेकी घुसल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर नांदेड जिल्हा पोलीस दल, रेल्वे सुरक्षा बल यांनी संयुक्तरित्या मोहिम राबवून दोन अतिरेक्यांना जीवंत पकडले.
पोलीस दलामध्ये अचानकपणे उदभवलेल्या परिस्थितीला सामोरे जाता यावे म्हणून वेगवेगळ्याप्रकारचे प्रात्यक्षीक घेतले जातात. त्यातील एक प्रात्यक्षिक आज रेल्वे स्थानकावर घेण्यात आले. सकाळी 11 ते 12.15 वाजेदरम्यान अचानकपणे रेल्वे स्थानकावर अतिरेकी लपले असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून प्रसारीत करण्यात आली. अशा प्रसंगांना आवश्यक असलेले पोलीस बल म्हणजे जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, जीआरपी, अतिरेकी प्रतिबंधक पथक आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी त्वरीत रेल्वे स्टेशन गाठले. रेल्वे स्थानकावर अचानकपणे आलेले पोलीस आणि त्यांच्याकडील एके 47 या बंदुका, सोबतच बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोलीस आपल्या विशेष गणवेशात आणि सोबत पोलीस दलातील अनेक श्वान रेल्वे स्थानकावर पाहुन तेथे असणाऱ्या लोकांमध्ये खळबळ माजली. सुदैवाने या वेळेत कोणतीही प्रवासी रेल्वे गाडी रेल्वे स्थानकावर उभी नव्हती.

रेल्वे स्थानकाच्या मुख्यद्वारापासून संपुर्ण फलाट क्रमांक 1 पोलीसांनी भरून गेला. लोकांना काही गैरसमज होईल म्हणून रेल्वे विभागाने हे प्रात्यक्षिक असल्याची घोषणा इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतून रेल्वे स्थानकाच्या ध्वनीक्षेपकातून केली. प्रात्यक्षीक असले तरी अतिरेकी कोठे लपलेले आहेत हे पोलीसांना माहित नव्हते.ते तर त्यांना आपल्या कौशल्यातून शोधायचे होते. सर्वच पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी आप-आपल्या कौशल्याचा वापर करून अखेर फलाट क्रमांक 1 वर दबा धरुन बसलेल्या दोन अतिरेक्यांचा शोध लावला आणि हे प्रत्याक्षीक संपले.

अचानकपणे उदभवणाऱ्या परिस्थितीसाठी जनतेने सुध्दा तयार राहायला हवे. कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता आपल्या जवळ असेल त्या भिंतीशी टेकून उभे राहायला पाहिजे, पळा-पळ करायला नको, फोना-फोनी करायला नको अशा परिस्थितीत आपल्यासाठी झटणाऱ्या पोलीस विभागाला त्यातून वेगळाच त्रास होतो.आजच्या परिस्थितीत रेल्वे विभागाने हे कार्य प्रात्यक्षीक असल्याची घोषणा केली. अशी घोषणा झाली नाही तरी जनतेने आपला संयम कायम ठेवून अचानक पणे उद्भवलेल्या त्रासदायक परिस्थितीला समर्थपणे सामोरे गेल्यानंतरच आम्हाला आमचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात यश येईल.
