नांदेड(प्रतिनिधी)-सविता गायकवाडवरील बनावट फायरिंग प्रकरणातील एका गुन्हेगाराला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस.जाधव यांनी 16 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. गोळी लागलेल्या महिला सविता गायकवाड यांनी मी स्वत:च हा बनावटपणा करून रहिम खान व इतरांची नावे त्यांना अडकविण्यासाठी फिर्यादीत लिहिली असा जबाब त्यांनीच 11 जानेवारी रोजी दिला असल्याची माहिती इतवारा पोलीसांनी न्यालयात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन समोर आली आहे.
9 जानेवारी रोजी रात्री पोलीसांना फोन करून मला वाचवा म्हणणाऱ्या सविता गायकवाड या महिलेने आपले पितळ उघडे पडल्यानंतर 11 जानेवारी रोजी पोलीसांसमक्ष सविस्तर जबाब दिला. 8 जानेवारीपासून हा कट कसा रचला गेला. याची सविस्तर माहिती दिली. 9 जानेवारी रोजी भोकरला अतिक या गुन्हेगाराला जामीन मिळविण्यासाठी मी एक वकील आणि एका मित्रासोबत गेले. सायंकाळी आम्ही परत आलो. त्या अगोदर मकोकामधील आरोपी नजीजोद्दीन उर्फ गुड्डू यास न्यायालयात जावून पाहुन, बोलून पण आले होते आणि 9 जानेवारीच्या रात्री 9 वाजेपासून बनावट गोळीबाराचा रचलेला कट प्रत्यक्षात आणणे या कृतीची सुरुवात झाली. त्या ठिकाणी गोपीनाथ हा पिस्टल घेवून आला आणि किरण मोरे येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेवून होता. बाफना ब्रिजवर कोणीच नाही ही संधी पाहुन मीच माझा हाता खांद्यासोबत सरळ केला आणि त्यानंतर गोपीनाथने माझ्या हातावर गोळी मारली. तेंव्हा मोठा जाळ झाला आणि ते दोघे निघून गेले. तेंव्हा मी पोलीसांना फोन केला. मी माझ्या मनात रहिम खान नुरखान बद्दल असलेला राग अशा पध्दतीने काढला आहे.
कालच स्थानिक गुन्हा शाखेने किरण सुरेश मोरे(26) रा.धनेगाव या युवकास ताब्यात घेवून इतवारा पोलीसांच्या स्वाधीन केले होते. आज पोलीस उपनिरिक्षक शेख असद, पोलीस अंमलदार मोहन हाके, अनिल गायकवाड आणि अविनाश पेंडकर यांनी बनावट गोळीबारात सहभागी असलेला किरण सुरेश मोरे यास न्यायालयात हजर केले. पोलीसांनी न्यायालयात सादर केलेल्या युक्तीवादानुसार स्वत:जवळ अग्नीशस्त्र बाळगुन शहरात दहशतनिर्माण करणाऱ्या या गुन्ह्यातील अग्नीशस्त्र जप्त करणे आहे. किती लोकांनी कट रचला व हा कट कोठे रचला आहे. याचा तपास करणे आहे. सविता गायकवाडवर गोळी झाडणारा गोपिनाथ मुंगल अद्याप फरार आहे. त्यास अटक करणे आहे. सविता गायकवाड व आरोपींमध्ये काही आर्थिक देवाण-घेवाण झाली आहे काय याचा शोध घेणे आहे असे मुद्दे मांडण्यात आले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश पी.एस.जाधव यांनी किरण मोरेला 16 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. किरण मोरेवर यापुर्वी सुध्दा खूनाचा गुन्हा दाखल आहे. काल स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी किरण मोरे आणि अवधुत दासरवाडला पकडले होते आणि या दोघांचा त्या बनावट फायरिंगमध्ये सहभाग असल्याची प्रेसनोट सुध्दा प्रसिध्द केली होती.
संबंधीत बातमी...
https://vastavnewslive.com/2023/01/10/मध्यरात्री-बाफना-पुलावर/