नांदेड(प्रतिनिधी)- बाऱ्हाळी गावात तीन दरोडेखोरांनी शिक्षक पती-पत्नीच्या घरात घुसून त्यांना चाकू आणि अग्नीशस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या घरातून जवळपास 17 लाख रूपयांचा ऐवज लूटल्याचा प्रकार घडला आहे.
12 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास बाऱ्हाळी गावात राहणारे नंदकुमार गबाळे या शिक्षकाच्या घरी कोणीतरी दार वाजविले. विचारणा केली असता गुरूजी काम आहे, जरा दार उघडा असे सांगण्यात आले. त्यावेळी घरात त्यांच्या शिक्षक असलेल्या पत्नी असे दोघेच होते. गुरूजी दार उघडा हे शब्द ऐकून नंदकुमार गबाळे यांना वाटले आपल्या ओळखीचा माणुस आहे. त्यांनी दार उघडले. समोर तीन युवक तोंडाला मफलर बांधलेले होते. एकाने गुरूजींना हाणामारी करून खाली पाडले. दुसऱ्याने गुरूजीच्या गळ्यावर चाकू लावला. त्यावेळी शिक्षक पत्नी म्हणाल्या तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन जा, पण आम्हाला मारू नका. त्यावेळी एकाने अलमारीने उघडायला लावली, त्यामध्ये 5 लाख रूपये रोख रक्कम आणि 22 तोळे सोने होते. हे सर्व दरोडेखोरांनी एका बेडशीटमध्ये बांधले. 22 तोळे सोन्याची आजची किंमत 11 लाख रूपये होते. अशा प्रकारे 17 लाख रूपयांचा ऐवज आपल्या सोबत घेऊन तीन दरोडेखोरांनी शिक्षक पती-पत्नीला एका खोलीत बंद केले. बंद करताना दरोडेखोरांनी पोलिसांना बोलाविले तर उदगीरच्या घरात येऊन जिवे मारून टाकू अशी माहिती सांगण्यात आली. तिघेही दरोडेखोर मोटारसायकलवर बसून पसार झाले. याबद्दल पोलीस विभागाने कार्यवाही सुरू केली आहे, परंतु वृत्त लिहीपर्यंत तरी या प्रकरणात काय प्रगती झाली याची माहिती मिळाली नाही.