राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

नांदेड (प्रतिनिधी)-खाजगीकरण, महागाई, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांचे प्रश्न, गायरान जमीन यासह विविध मागण्यांसाठी दि. 14 रोजी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शनिवार दि. 14 रोजी शहरातील महात्मा फुले पुतळा परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालयालय असा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेश आणि शिक्षक मतदारसंघाची आचारसंचिता यामुळे महात्मा फुले पुतळा परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आला होता. गायरान जमिनीवरील अतिक्रमण कायम करून झोपडपट्टी धारकांना, भूमिहीन शेतमजूरांना मालकी हक्क द्यावी. रोजगार हमी विकास कामाचे व्यवस्थापन करण्यात यावे. शेतकऱ्यांना 50 टक्के विजबिल माफ करावे, तसेच 60 वयवर्षे पुर्ण झालेल्या शेतकरी, शेतमजूरांना दहा हजार रूपये महिना पेन्शन द्यावी, नरेगा – मनरेगा अंतर्गत सिंचन, उर्ध्व सिंचन विहीर, गावतळे, पाझर तलावाचे काम करण्यात यावे, नांदेडमध्ये उर्दु विद्यापीठ स्थापन करावे, पारंपरिक व्यावसायिक असलेले कुंभार, वडार-कैकाडी बुरूड यांना दगड, माती, बांबू वाहतुकीचा परवाना द्या, ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन लागू करा, जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे, पोस्ट ऑफीसजवळील मोकळ्या जागेत महापालिका प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक व ग्रंथालय उभारावे, आसना नदीवर 10 टीमसी क्षमतेचा बंधारा उभारण्यात यावा, महापालिका हद्दीतील वे घर, स्थलांतरीत सफाई कामगार, हमाल, बिडी कामगारांना प्लॉट देवून पक्के घर बांधून द्यावेत, डंकीन ग्राऊंड परिसरात महापालिकेच्या ठरावाप्रमाणे तथागत गौतम बुद्धांचा 100 फुट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा, लोककलावंत, समाजप्रबोधनकार किर्तनकार यांना दरमहा मानधन देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला, शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळून निघालेला इशारा मोर्चा शिवाजीनगर, कलामंदीर, पोलिस अधीक्षक कार्यालय मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी येथे सभा घेऊन राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर प्रशासनास मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी वंचितचे नेते गायरान जमीन अतिक्रमण आंदोलक समन्वय समितीचे प्रमुख अशोक सोनोने, वंचितच्या कार्यकारीणी सदस्य शमिभा पाटील, वंचित युवा आघाडीचे मराठवाडा निरिक्षक अमित भुईगळ, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष पालमकर, प्रा.राजू सोनसळे, राहुल चिखलीकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
