नांदेड(प्रतिनिधी)-शिवा पाटलाच्या मदतीला आले प्रदिप पाटील आणि ही कृती विभागीय शिस्त व अपील प्रमाणे चुकीची होती. कारण शिवा पाटलाची गाडी बेकायदेशीर वाळू वाहतुक करत होती आणि त्यांच्या मदतीला आलेल्या प्रदीप पाटील उर्फ उबाळेवर आली निलंबनाची वेळ. उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी वसरणी सज्जाचे तलाठी प्रदीप वामनराव उबाळे (पाटील) यांना निलंबित करून निलंबन काळात अर्धापूर तहसील येथे हजेरी लावली आहे. ज्या अवैध वाळूच्या गाडीसाठी ही कार्यवाही झाली ती गाडी तहसीलदार किरण अंबेकर यांनी शोधून जप्त करत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उभी केली आहे.
दि.12 जानेवारी रोजी रात्री तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार डांगे मंडळ अधिकारी आर.डी.शिंदे, तलाठी एम.एन.देवणे, एम.एच.भिसे हे पथक रात्रीची गस्त करत असतांना मौजे फत्तेजंगपुर, बॉम्ब शोधक आणि नाशक कार्यालयासमोर त्यांनी हायवा गाडी क्रमांक एम. एच.23 ए.यु.1258 थांबवली. या गाडीमध्ये सहा ब्रास रेती भरलेली होती. वेळ रात्रीची या वेळेत महसुल कायद्याप्रमाणे वाळुची वाहतुकच करता येत नाही. तरीपण महसुल पथकाने चालकाला वैध पुरावा विचारला. तो नव्हताच तर देणार कुठून म्हणून ती गाडी महसुल पथकाने तहसील कार्यालयाकडे आणण्याची सुरूवात केली. तेवढ्यात गाडीचे मालक शिवा पाटील आले आणि त्यांनी तलाठी प्रदीप पाटलांना पण बोलावले. प्रदीप पाटील यांनी आपल्याच सहकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून ती बेकायदेशीर वाळू वाहतुक करणारी हायवा सोडून देण्यास सांगितले. सोबतच परिणाम वाईट होतील अशी धमकीपण दिली. पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेले अशा प्रकारे तलाठी प्रदीप पाटील साहेबांनी शासकीय कामात अडथळा केला असा अहवाल नायब तहसीलदार महसुल-2 यांनी पाठवला.
या अहवालानंतर उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी तलाठी प्रदीप वामनराव उबाळे पाटील यांना वारंवार सुचना देवूनही त्यांच्या कामात सुधारणा झाली नाही. त्यांचे काम समाधानकारक नाही म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या पोट कलम 4(1) नुसार दि.13 जानेवारीपासून शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. निलंबन काळात तलाठी प्रदीप पाटील साहेबांना कोणतीही खाजगी नोकरी करता येणार नाही. त्यांच्याविरुध्द चौकशी होईल, निलंबन काळात त्यांना तहसील कार्यालय अर्धापूर येथे हजर राहायचे आहे. तेथे उपस्थित असल्याबद्दलचे प्रमाणपत्र दरमहा उपविभागीय अधिकारी नांदेड यांना सादर करायचे आहे. अशा प्रकारे निलंबित पोलीस आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचे मालक शिवा पाटील यांच्यासाठी मध्यरात्री धावून आलेल्या तलाठी प्रदीप वामनराव उबाळे (पाटील) यांना आता निलंबित व्हावे लागले आहे.
एम.एच.23 ए.यु.1258 या वाहनाला काही महिन्यांपुर्वी नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी पोलीस ठाणे विमानतळच्या हद्दीत रात्रीच्यावेळीच पकडले होते. त्या कार्यवाहीमध्ये 3 लाख रुपये पेक्षा जास्त दंड लावल्यानंतर ती गाडी सोडण्यात आली होती. पुन्हा ती गाडी अवैध वाळू वाहतुकीतच लागली. ही गाडी कोणी प्रविण राऊत नावाच्या माणसाची आहे असे परिवहन कार्यालयाच्या ऍपवर पाहिले असता दिसते. आजच्या परिस्थिती या गाडीची नोंदणी 21 जुलै 2024 पर्यंत वैध आहे. तसेच प्रदुषण प्रमाणपत्र 17 जुलै 2023 पर्यंत वैध आहे.
12 जानेवारी रोजी निलंबित पोलीस शिवा पाटील आणि आता निलंबित तलाठी प्रदिप पाटील यांनी ही गाडी महसुल पथकाच्या ताब्यातून काढून घेतली होती. यानंतर तहसीलदार किरण अंबेकर यांनी अनेक गुप्तहेर लावून या वाहनाचा शोध घेतला तेंव्हा हे वाहन एका गॅरेजमध्ये उभे होते. कायदेशीर पध्दतीने या वाहनाचा जप्ती पंचनामा करून सध्या हे वाहन तहसील कार्यालय नांदेडच्या प्रांगणात उभे करण्यात आलेले आहे.
अवैध वाळू वाहतुकीत शिवा पाटलांच्या मदतीला आले तलाठी प्रदिप पाटील आणि झाले निलंबित