माध्यमांनी बातमीची सत्यता पडताळावी-न्या.जज

संविधान उद्देशिका देवून पत्रकारांचा सत्कार

नांदेड (प्रतिनिधी)-माध्यमात काम करत असताना धावपळ असते, मात्र असे असेल तरी चुकीची माहिती लोकांपर्यंत जाऊ नये, त्यामुळे माध्यमात काम करणाऱ्यांनी आपली जबाबदारी म्हणून बातमीची सत्यता पडताळूनच ती प्रकाशीत केली पाहिजे तरच माध्यमांची विश्वासार्हता टिकून राहिल असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश दलजित कौर जज यांनी केले. त्या पीपल्स महाविद्यातील आयोजित कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
रविवार दि.15 जानेवारी रोजी सकाळी शहरातील पीपल्स महाविद्यालयातील कै.नरहर कुरूंदकर सभागृहात पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार संतोष पांडागळे यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, प्रकाश कांबळे, ऍड. दिलीप ठाकूर, ऍड. शितल आगाशे उपस्थित होते. प्रारंभी महापुरूषाच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक ऍड. अनुप आगाशे यांच्यावतीने मान्यवरांच्याहस्ते उपस्थित पत्रकारांना संविधान उद्देशिका देवून उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना न्या. जज पुढे म्हणाल्या की, पत्रकारांनी सत्य समोर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. सत्य कटू असते ही बाब खरी असली तरी जबाबदारी म्हणून पत्रकारांनी सत्यता शोधून सर्वांपुढे आणली पाहिजे. प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान असले पाहिजे, कायदा समजण्यासाठी समाजात जनजागृती होणे आवश्यक आहे. प्रत्येकाला कायदा समजु लागल्यास गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल. आज पोक्सो सारखे कायदा असतानाही मोठ्या प्रमाणात अल्पवयीन बालकांवर अत्याचार होत आहेत. जर या कायद्या संदर्भात जनजागृती झाली तर अशा गुन्ह्याचे प्रमाण कमी होईल. असे म्हणत सर्व उपस्थितांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. यापुर्वी व्यासपीठार उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्यने पत्रकार, महिला, नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जोंधळे यांनी तर अभार कचकलवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *