नांदेड(प्रतिनिधी)-चार चाकी गाडीमध्ये अत्यंत निर्दयीपणे गायीला कोंबून नेणाऱ्या त्या गाडीला स्थानिक गुन्हा शाखेने पकडल्यानंतर गायी नेणारे गाडी सोडून पळून गेले.
आज स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार एका चार चाकी गाडीत मुदखेडकडून नांदेडकडे गायीला आणले जात आहे. तेंव्हा माळटेकडी परिसरात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार संजय केंद्रे, पद्मसिंह कांबळे, सलिम बेग, विठ्ठल शेळके, मारोती मोरे, बालाजी यादगिरवाड आणि हेमंत बिचकेवार यांनी रोखले. चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एल 2911 अत्यंत भरधाव वेगात आली. माळटेकडी पुलाजवळ त्या गाडीला पोलीसांनी थांबण्याचा इशारा केला तेंव्हा गाडीतील तीन लोक गाडी सोडून पळून गेले. त्या गाडीत एक लाल रंगाची गाय चारही पाय आणि तोंड बांधून कोंबलेली होती. 40 हजार रुपये किंमतीची गाय आणि 3 लाख रुपये किंमतीची चार चाकी गाडी असा 3 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी जप्त केला आहे. पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 17/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 34 आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 च्या कलम 9 तसेच प्राण्यांना कु्ररतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 च्या कलम 11 (1) (घ)(च) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारचाकी गाडीत गाय कोंबुन नेतांना स्थानिक गुन्हा शाखेने पकडले