नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या भावाला विद्युत झटक्यातून वाचवणाऱ्या एका बालिकेची दखल भारतीयस्तरावर झाली असून आता तिला 26 जानेेवारी 2023 रोजी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे.
21 सप्टेंबर 2021 रोजी आरळी ता.बिलोली येथील आनंदा तुकाराम येडलेवार यांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या कन्येने हे शौर्य दाखवले आहे. त्या दिवशी घरातील विज पुरवठाचा वायर उंदराने कुरतडल्यामुळे तो विज प्रवाह घरातील पत्रांमध्ये प्रवाहित झाला. लक्ष्मीचा चुलत भाऊ आदित्य हा त्या विद्युत प्रवाहच्या झटक्यात अडकला आणि जागीच तडफडू लागला. लक्ष्मीने आपल्या भावाच्या जिवाची चिंता करतांना कोणत्याही भितीला आपल्याजवळ येण्यास मज्जाव केला आणि अत्यंत धैर्यवानपणे तिने आपल्या भावाला विद्युत तारेच्या प्रवाहातून काही क्षणात वेगळे केले. भावाला वेगळे करतांना लक्ष्मीला यश आले. पण ती त्या उघड्या विद्युत वायरच्या झटक्यात अडकली. त्यामुळे पुन्हा तिच्या जीवाचा प्रश्न आला. तरी तिने न घाबरता स्वत:ला त्या विद्युत झटक्यातून वेगळे केले.
या घटनेची नोंद त्यावेळी पोलीस ठाणे रामतिर्थ येथे झाली होती. शनिवार दि.14 जानेवारी रोजी लक्ष्मी या नांदेड जिल्हयातील कन्येला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार जाहीर होताच गावातील सर्व लोकांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष्मीचे कौतुक केले आहे. अत्यंत सर्व सामान्य कुटूंबात जन्मलेल्या लक्ष्मी येडलेवारने केलेले हे धाडस तिच्या भावाला वाचविण्यासाठीच होते. परंतू त्याची दखल राष्ट्रीय स्तरावर झाली. लक्ष्मीने प्रसार माध्यमांना सांगितले की, माझा भाऊ आदित्य विद्युत प्रवाहात अडकला होता. त्याला वाचविण्यापलीकडे मला कोणतीच काही भिती वाटली नाही. आपल्याला पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे याचा आनंद व्यक्त करतांना तिला शब्द येत नव्हते. नांदेड जिल्ह्यातील कन्येला मिळालेला हा बाल शौर्य पुरस्कार बहुदा दुसरा पुरस्कार आहे. या अगोदर अर्धापूर तालुक्यातील एका बालकाने पाण्यात बुडणाऱ्या आपल्या मित्राला अत्यंत धैर्यवानपणे वाचवले होते. त्यालाही राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्यात आला होता.
नांदेड जिल्ह्यातील बालिका लक्ष्मी येडलेवारला मिळाला राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार