
नांदेड,(प्रतिनिधी)- ज्या हायवा गाडीला अवैध्य वाळू वाहतूक करतांना पकडले होते.आता त्या गाडीच्या बाजारमुल्या एव्हडी रक्कम भरली तरच गाडी सुटणार आहे नसता तहसीलदार नांदेड यांनी त्या हायवा गाडीचा लिलाव करून ती रक्कम शासन जमा करावी असे आदेश उप विभागीय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी विकास माने यांनी निर्गमित केले आहेत.
दिनांक १२ जानेवारी रोजी महसूल पथकाने हायवा गाडी क्रमांक एमएच २३ एयू १२५८ ही अवैध्य वाळूसह नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडली.तेव्हा वसरणी सज्जाचे तलाठी प्रदीप वामनराव उबाळे (पाटील) हे गाडी मालक शिवा पाटील यांच्या मदतीला आले आणि आपल्याच महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर बिघडले.याची किंमत त्यांना निलंबनात मोजावी लागली. प्रदीप पाटील हे सुद्धा सन २००६ मध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर नोकरीला लागले होते.नंतर त्यांनी तलाठी परीक्षा दिल्या त्यातील एक परीक्षेच्या वेळेस त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन टाकले होते.त्यामुळे तेव्हाच्या परीक्षेतील सर्व परीक्षार्थीचे चार गुण वाढवावे लागले होते. त्यानंतरची परीक्षा प्रदीप पाटील उत्तीर्ण झाले आणि पोलीस शिपाई पद सोडून तलाठी पदावर कार्यरत आहेत.
१२ जानेवारीच्या घटने नंतर नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी अवैध्य वाहतूक करणारी ती हायवा गाडी शोधून काढली.सध्या ती हायवा गाडी तहसील कार्यालयाच्या प्रागंणात उभीं आहे.या गाडी क्रमांक एमएच २३ एयू १२५८ बाबत विकास माने यांनी एक आदेश पारित केला आहे.त्यानुसार १८ ऑगस्ट २०२२ रोजी हायवा गाडी अगोदर सुद्धा अवैध्य वाळू वाहतुकीसाठी पकडण्यात आली होती.त्यावेळी त्या गादीवर ३ लाख २६ हजारांचा दंड आकारण्यात आला होता.दंडाची रक्कम ३ लाख २६ हजार रुपये भरल्यानंतर १९ ऑगस्ट २०२२ रोजी ती गाडी सोडण्याचे आदेश पारित करण्यात आले होते.
त्यावेळी ऑगस्ट २०२२ मध्ये गाडी मालक शिवा पाटील यांच्या कडून महाराष्ट्र अध्यादेश दिनांक १२ जानेवारी २०१८ आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ आणि २०१५ चा अध्यादेश १२ जून २०१५ नुसार अवैध्य वाळू वाहतूक करणारी ती हायवा गाडी क्रमांक १२५८ हि पुढे भविष्यात गौण खनिज अनाधिकृतपणे काढण्यासाठी,वाहतूक करण्यासाठी,गौण खनिज विल्हेवाट लावण्यासाठी असे बंधपत्र लिहून दिले होते.तरीही ती हायवा गाडी क्रमांक १२५८ हि अवैध्य वाळू वाहतूक करतांना पडकण्यात आली आहे.नियमावली नुसार आता ती हायवा गाडी आजच्या बाजारमूल्या एव्हडी रक्कम भरल्यानंतरच सोडली जाऊ शकते.असाच आदेश उप जिल्हाधिकारी विकास माने यांनी दिला आहे.आता या गाडीचे मालक शिवा पाटील यांनी त्या गाडीच्या आजच्या बाजारमुल्या एव्हडी रक्कम भरल्यानंतरच ती हायवा गाडी क्रमांक १२५८ सोडवता येणार आहे.असे न झाल्यास तहसीलदार नांदेड यांनी त्या गाडीचे बाजारमूल्य काढून त्या गाडीचा लिलाव करायचा आहे आणि ती रक्कम शासन जमा करायची आहे.
या आदेशाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड यांना माहितीस्तव,उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या कार्यवाहीसाठी,तसीलदार नांदेड, पोलीस निरीक्षक नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे आवश्यक त्या कार्यवाही साठी आणि गाडी मालक शिवा पाटील यांना अनुपालनासाठी तहसीलदार नांदेड यांच्या मार्फत पाठवण्यात आल्या आहेत.पण यातील पोलीस निरीक्षक नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे यांनी आदेश पारित झाल्यानंतर अद्याप काहीच कार्यवाही केलेली दिसत नाही.
