नांदेड(प्रतिनिधी)-उद्या दि.20 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेत होणार असल्याचे पत्र व्हायरल झाले आणि त्यानंतर ती बैठक घेतली जावू शकते काय ? यावर व्हाटसऍप संकेतस्थळावर चर्चा सुरू झाली आहे.
आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अभिजित राऊत यांच्या स्वाक्षरीने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबत पत्र निर्गमित झाले. या पत्रात 13 जानेवारीचे 2 पत्र आणि 19 जानेवारीचे तिसरे पत्र असे संदर्भ जोडण्यात आले आहेत. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रिडा व युवक कल्याण आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेत होणारी ही बैठक आहे. अगोदर या बैठकीचा दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. आज 19 जानेवारी रोजी व्हायरल झालेले पत्र त्यात या बैठकीचा दिनांक 20 जानेवारीच आहे. पण बैठकीचा वेळ दुपारी 12.30 वाजता निश्चित करण्यात आलेला आहे. बैठकीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी विषयसुचीमधील सर्व आवश्यक आणि अद्यावत माहिती घेवून उपस्थित राहण्यास सांगितले आहे. गैरहजर राहिल्यास शासन नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असेही या पत्रात लिहिलेले आहे.
हे पत्र व्हाटसऍप संकेतस्थळांवर व्हायरल झाले. त्यानंतर यावर चर्चा सुरू झाल्या. त्या चर्चेनुसार सध्या निवडणुक आचार संहिता लागू आहे. निवडणुक आचार संहिता लागू असतांना अशी बैठक घेता येवू शकते काय? सोबतच त्यावर क्रिया, प्रतिक्रिया अशी अनेक टिपणे केली जात आहेत. पण जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या पत्रानुसार ही बैठक आयोजित केली असेल तर त्याला बदलणार कोण? व्हाटसऍप संकेतस्थळांवर याची चर्चा मात्र सुरू आहे.
