नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड जवळ आपल्या गाडीत जनावरे घेवून खरेदी विक्रीच्या व्यवहाराला जाणाऱ्या एका व्यक्तीला रोखून त्याच्या पायावर खंजीर मारुन 1 लाख 40 हजार रुपयांची लुट झाली आहे. एका 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 58 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण लुटल्याचा प्रकार स्वागतनगर नांदेड भागात घडला आहे. बिलोली शहरात भांड्यांचे दुकान फोडून चोरट्यांनी 50 हजार 500 रुपयंाचा ऐवज लुटला आहे.
मोहम्मद एकबाल बाबूलाल कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.19 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता ते आपली चार चाकी गाडी क्रमांक टी.एस.08 जी.1575 मध्ये काही जनावरे घेवून खरेदी विक्री करण्यासाठी जात असतांना ईजळीफाट्याजवळ एक मोटारसायकल त्यांच्या गाडीसमोर उभी करण्यात आली. आपली गाडी हळू वेगात करून मोहम्मद एकबाल पुढे जात असतांना एकाने त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर खंजीरने आठ ते दहा वेळेस वार केले. त्यांच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला सुध्दा मारहाण करण्यात आली. मोहम्मद एकबालच्या जॅकेटमध्ये ठेवलेले 1 लाख 40 हजार रुपये लुटून हा हल्लेखोर पसार झाला. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा जबरी चोरी सदरात दाखल केला असून पोलीस निरिक्षक महेश शर्मा अधिक तपास करीत आहेत.
लिलावती पुंडलिकराव लोणे या महिला स्वागतनगर भागातून मेडीकल खरेदी करून आपल्या घराकडे जात असतांना दि.19 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजेच्यासुमारास बिनानंबरच्या मोटारसायकलवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील 58 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण तोडून पळ काढला. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा जबरी चोरी सदरात दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे हे करीत आहेत.
बिलोली येथील विनोद राजेंद्रराव जोशी यांनी आपले दुकान 18 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता बंद केले आणि घरी गेले. 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता दुकान उघडण्यास आले असतांना त्यांचे दुकान फोडलेले होते. तपासणी केली असता त्यातून पितळी भांडी, तांब्याचे मोड असा 50 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला होता. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा चोरीच्या सदरात दाखल केला असून पोलीस अंमलदार मुद्देमवाड अधिक तपास करीत आहेत.
व्यापाऱ्याचे 1 लाख 40 हजार रुपये लुटले; महिलेचे 58 हजारांचे गंठण तोडले; भांड्याची दुकान फोडली