नांदेड(प्रतिनिधी)-1970 च्या दशकात शोले या चित्रपटात गाजलेले शब्द मरजाऊंगा, गिरजाऊंगा, कहा है बसंती आज पुन्हा एकदा 50 वर्षानंतर नांदेडकरांना स्वातंत्र सैनिक कॉलनीमध्ये पाहायला मिळाले.
आज सकाळी 10 वाजेच्यासुमारास स्वातंत्र सैनिक कॉलनी, शोभानगरच्या मध्ये असलेल्या एका जलकुंभावर एक तरुण देविदास बोलींदरसिंग सिबियास (30) रा.वेदांतनगर हा गेला. तेथे असणाऱ्या जलकुंभावरील मनपाच्या सेवकाने त्याला बोलावण्याचा प्रयत्न केला तेंव्हा तो सांगत होता माझी बायको आणि मुल घरी येणार नाहीत तो पर्यंत मी खाली येणार नाही. कारण काही दिवसांपासून त्याची पत्नी तीन मुल घेवून माहेरी गेली आहे. देविदासची पत्नी रेखा आहे. त्या सर्वांना बोलवा नाही तर मी जलकुंभावरून खाली उडी मारतो असे देविदास सांगत होता. आज 60 च्या वयात असणाऱ्यांना हा प्रसंग पाहुन शोले चित्रपटाची आठवण येत होती. त्या चित्रपटात बसंतीसाठी विरुने असेच काही केले होते. त्या चित्रपटात मात्र बसंती विरुची पत्नी नव्हती तर विरु बसंतीला आपली पत्नी करू इच्छीत होता. पण आज देविदासने आपल्या पत्नी व तीन मुलांसाठी असा प्रसंग उभा केला. जो शोले चित्रपटासारखा होता.
घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल, विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, पोलीस उपनिरिक्षक जाधव, काही बिट मार्शल घटनास्थळी पोहचले. सर्वांनी महत प्रयासाने देविदास सिबियासला जलकुंभाखाली आणले आणि शोले चित्रपटाच्या सुरू असलेल्या दृश्यावर मध्यांतर असे दिसले.दुपारी 12.45 वाजता देविदासला समजावून विमानतळ पोलीसांनी त्याला घरी पाठवून दिले आहे. वृत्तलिहिपर्यंत देविदासची पत्नी रेखा आणि त्यांची मुले आली होती की, नाही याबद्दल माहिती प्राप्त झाली नाही. कारण ते तेलंगणा राज्यातील हैद्राबादजवळच्या कोणत्या तरी गावात राहतात. शोले चित्रपटाची आठवण करून देविदासने 50 वर्षानंतर उभारलेला आजचा प्रसंग का उभा करावा लागला. याचा विचार कोण करेल? या बाबतचा विचार फक्त आणि फक्त देविदास सिबियानेच करायला हवा. आजच्या या शोले चित्रपटाला पाहण्यासाठी जमलेली गर्दी त्यांना झालेली करमणुक हा वेगळा विषय आहे. या संदर्भाने देविदासने आपले स्वत:चे आत्मपरिक्षण केले तर भविष्यातील जीवनात असा प्रसंग तयार करण्याची गरज पडणार नाही.
प्रशासनाला खाजगी व्यक्तींच्या जीवनातील कौटुंबिक प्रसंग सुध्दा अशा पध्दतीने सांभाळावे लागतात. हे पाहिल्यानंतर त्यांना मिळणारी पगार आणि त्यांनी आज केलेले काम, त्यांच्यावर होणारे आरोप, त्यांच्या विरुध्द केले जाणारे कटकारस्थान या समाजामध्ये किती मुर्खपणाचे आहेत हे दिसते. एखाद्या व्यक्तीला मृत्यू पासून वाचविण्यासाठी आज पोलीस विभाग, महानगरपालिका, अग्नीशमन विभाग या मंडळींनी घेतलेली मेहनत नक्कीच प्रशंसनिय आहे.