
नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा गेट क्रमांक 3 जवळ असलेल्या प्रवासांच्या खोली क्रमांक 46 मध्ये काही अतिरेकी आले होते. नांदेडच्या पोलीस पथकाने त्या कक्ष क्रमांक 46 मध्ये असलेले तीन अतिरेकी कंठस्नान न घालता ताब्यात घेतले. हा सर्व मॉकड्रीलचा प्रकार होता. पण त्या ठिकाणी घडलेला हा प्रकार एवढ्या सुनियोजितपणे चालविला गेला की, बघणाऱ्यांना खरेच अतिरेकी आहेत की, काय ? असा भास जरुर झाला.
आज दुपारी 3 अतिरेक्यांनी गुरूद्वारातील काही भाविकांना प्रवासांसाठी असलेल्या कक्षांमधील कक्ष क्रमांक 46 मध्ये डांबून ठेवल्याची माहिती पोलीस विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार अत्यंत जलदगतीने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्या अधिकाऱ्यांना त्वरीत हालचालीचे आदेश दिले. त्यानुसार अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नियंत्रणात अतिरेक्यांची मोहिम हाताळण्याची मोहिम देण्यात आली. या जबाबदारीमध्ये महत्वपुर्ण भुमिका गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी वठवली. सोबत शहरभर नाकाबंदी करण्यात आली आणि कक्ष क्रमांक 46 वर कार्यवाही करण्यासाठी जलद प्रतिसाद पथकाचे युवक, आरसीपी पथकाचे जवान यांनी अत्यंत निष्णातपणे त्या परिसरात उपस्थित असलेल्या इतर कोणत्याही भाविकाला इजा पोहचणार नाही अशा पध्दतीने कक्ष क्रमांक 46 वर नजर ठेवली. हळुहळु अत्यंत व्यावसायिकपणे आपल्या अधिकाऱ्यांचे आदेश पालन करत पोलीस अंमलदरांनी अखेर त्या कक्ष क्रमांक 46 मध्ये प्रवासांना ओलीस ठेवणाऱ्या तिन्ही अतिरेक्यांना जेरबंद करून प्रवाशांची सुखरुप सुटका केली. हा सर्व प्रकार मॉकड्रीलचा असला तरी इतर उपस्थितांच्या मनात अत्यंत कौतुहल तयार झाले होते. अतिरेक्यांना पोलीस पथकाने जेरबंद केल्यानंतर याबाबतची माहिती ध्वनीक्षेपकावरुन प्रसारीत करण्यात आली आणि त्यानंतर सर्वांनी सुसकाराला तोडला.

या मॉकड्रीलमध्ये पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीश काशीकर, भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकार आडे, आर्थिक गुन्हा शाखेचे माणिक बेेद्रे, नियंत्रण कक्षातील जयप्रकाश गुट्टे, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे, पोलीस उपनिरिक्षक मारोती दासरे, विठ्ठल घोगरे, क्युआरटी आणि आरसीपी पथकातील पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला होता.