अमिर खानवर चाकु हल्ला; रस्त्याने पळाला; मदत कोणी केली नाही

नांदेड(प्रतिनिधी)-एका हॉटेल मालकावर हल्लेखोराने केलेला हल्ला कालपासून चर्चेत होता. हल्लेखोरापासून वाचण्यासाठी हॉटेल मालकाने भर रस्त्यावरून पळ काढला. अनेकांनी ही घटना पाहिली पण हल्लेखोराला रोखण्याची हिंमत कोणाचीच झाली नाही. आज हा हॉटेल मालक विमानतळ पोलीसांना जबाब देत आहे.
काल दि.21 जानेवारीच्या सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास असणाऱ्या एम.एच.26 या हॉटेलचे मालक अमिर खान दिलवर खान (32) यांना दोन दिवसांपुर्वी छोट्या भावासोबत झालेल्या कुरबुरीबाबत जडजोड करण्यासाठी बोलावले.बोलावणारा गिरीष सखाराम बडगर हा होता.गिरीष बडगर हा अत्यंत नामांकित पध्दतीने पोलीस दलात ओळखला जाणारा व्यक्ती आहे. अमिर खान समोर आल्यानंतर गिरीष बडगरने त्याच्यावर हल्ला करणारच अशा परिस्थितीत असतांना अमिर खान यांनी भर रस्त्यावरून पळ काढला. अनेकांनी हा थरार पाहिला पण अमिर खानची मदत करण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. अमिर खान पळत आपल्याला वाचविण्यासाठी जागा शोधत असतांना त्यांना माणिक पेट्रोल पंपाची कॅबीन सुरक्षीत वाटली. पण खंजीर घेवून गिरीष बडगर हा त्यांच्या पाठीमागेच होता. त्याने अमिर खानच्या पाठीत खंजीरने वार केले. अमिर खान जखमी होताच गिरीष बडगर मोठ्या साळसुदपणे त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका बसला हात दाखवून त्यामध्ये बसून निघून गेला.
विमानतळ पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनीच जखमी अवस्थेतल्या अमिर खान दिलवर खानला दवाखान्यात उपचारासाठी नेले. कालची परिस्थिती गंभीर होती म्हणून आज ते आपल्यावर झालेल्या हल्याचा जबाब पोलीसांसमोर देत आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार जीवघेणा हल्ला या सदरात हा गुन्हा दाखल होईल.घडलेला हा सर्व थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे. पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांनी सांगितले की, आम्ही लवकरात लवकर हल्लेखोर गिरीष बडगरला शोधून काढून आणि त्याला गजाआड करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *