नांदेड(प्रतिनिधी)-स्वच्छ नांदेड सुंदर नांदेड अशा फक्त वल्गना करणाऱ्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने जनतेला कोणत्याही भौतिक सुविधा योग्यरितीने पुरविल्याच नाहीत. पण कर वसुल करतांना नागरीकांना त्रास देणे सुरू झाले आहे.यात सुध्दा ज्यांना चांगले करायचे आहे त्यांची वृत्ती तशीच असते अशाच गोदावरी जीव रक्षक दलाच्या कांही सदस्यांनी संत दासगणुपुल नावघाटवर पडलेले खड्डे स्वखर्चाने आणि स्वमेहनतीने बुजविणे सुरू केले आहे.
नगर पंचायत, नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका या सर्वांची जबाबदरी या भागात राहणाऱ्या नागरीकांना भौतिक सुविधा भक्कमपणे पुरविणे ही त्यांची जबाबदारी असते. त्यासाठी विविध प्रकारचे कर वसुल केले जातात आणि त्या कराच्या माध्यमातून त्या भौतिक सुविधा पुरविल्या जातात. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आम्ही उत्कृष्ट महानगरपालिका आहोत असा देखावा तयार करतात. स्वच्छ नांदेड, सुंदर नांदेड, सुरक्षीत नांदेड अशा शब्दांनी नांदेडभर बॅनर जवले आहेत.परंतू प्रत्यक्षात असे आहे काय? असे नक्कीच नाही.
जुन्या नांदेड शहरात गोदावरी नदीकाठावर दक्षीण उत्तर असा एक पुल आहे. त्या पुलाचे नाव संत दासगणु पुल किंवा नावघाट पुल असे म्हटले जाते. या पुलावर अनेक खड्डे पडले आहेत. उत्तरेकडून दक्षीणेकडे येणारी भरपूर मोठी वाहतुक या पुलावरून येत असते. त्यामुळे वाहन धारकांना सुध्दा त्रास झाला. या संदर्भाने अनेक मागण्या करून सुध्दा या पुलाची दुरूस्ती किंवा खड्डेबुजवणी करण्यात आली नाही. तेंव्हा गोदावरी जीवरक्षक दलातील प्रमुख मुस्ताक यांच्या नेेतृत्वात काही युवकांनी स्वखर्चाने आणि स्वत:च्या मेहनतीने या पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम आज सुरू केले आहे.या कामाचे नांदेडकरांनी कौतुक केले पाहिजे.

स्वखर्चाने आणि स्वकष्टाने युवकांनी बुजवले संत दासगणुपुलावरील खड्डे