नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीसांच्या सायबर शाखेने दोन व्यक्तीचे ऑनलाईन लुटलेले 6 लाख 29 हजार 777 रुपयांपैकी 2 लाख 54 हजार 780 रुपये परत त्यांच्या खात्यात आणून दिले आहेत.
विनायक गोपाळराव फुटाणे या लघुलेखकाच्या मोबाईलवर युनो नेट बॅंकींगची लिंक आली. त्या लिंकमधील मागणीनुसार विनायक फुटाणे यांनी आपला आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम कार्डचा सीव्हीसी क्रमांक भरला. माहिती भरताच त्यांच्या खात्यातून 5 लाख 89 हजार 777 रुपये ऑनलाईन गायब झाले. या बाबत भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
तसेच दुसऱ्या एका प्रकारणात तुषार गजानन आमदुरे यांच्या मोबाईलवर एका अनोळखी माणसाने लिंक पाठवली. ती लिंक क्लिक करताच त्यांच्या खात्यातून 40 हजार रुपये गायब झाले. हा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
या दोन्ही गुन्ह्यांच्या संदर्भाने पोलीस ठाण्यांनी सायबर विभागाशी संपर्क साधला. तेथील पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक थोरवे, पोलीस अंमलदार विलास राठोड यांनी दोन्ही प्रकरणातील फिर्यादींकडून सविस्तर माहिती जमा केली आणि बॅंकेचे नोडल अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधला. वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यानंतर बॅंक अधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरुन फसवणूक करण्यात आलेल्या 6 लाख 29 हजार 777 रुपयांपैकी 2 लाख 54 हजार 780 रुपये परत तक्रारदारांच्या खात्यात जमा करून दिले.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी ही कामगिरी करणाऱ्या सायबर विभागातील पोलीसांचे कौतुक केले आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर विभागाची उत्कृृष्ट कामगिरी